Ratnagiri : ऑटो रिक्षा भाडेवाढीप्रश्नी निर्णय न झाल्यास लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा

रत्नागिरी : जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक-मालकांची वाढती आर्थिक कोंडी, महागाईचा वाढता फास आणि शासनाच्या धोरणात्मक दुर्लक्षामुळे रिक्षा व्यवसाय अक्षरशः अडचणीत सापडला असून, ऑटो रिक्षा भाडे दरपत्रकात तातडीने सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेने केली आहे.

या संदर्भातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अजित ताम्हणकर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर, संदीप भडकमकर, कार्यवाह राजन घाग, संतोष दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शासनाकडून मागेल त्याला रिक्षा परवाने देण्याच्या धोरणामुळे जिल्ह्यात रिक्षांची संख्या बेसुमार वाढली असून, त्यामुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणारा मूळ रिक्षाधारक आर्थिकदृष्ट्या पूर्णतः मेटाकुटीला आला आहे.

दरम्यान, ही परिस्थिती लक्षात घेऊन सुरू असलेली रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, पालकमंत्री व परिवहन आयुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून करण्यात आली असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 07/Jan/2026