जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे रत्नागिरीत थाटात उद्घाटन

रत्नागिरी : आजचे बालक उद्याचे नागरिक आहेत. नागरिक म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. ती पेलण्यासाठी, आव्हानांना पेलण्यासाठी बुद्धी व शरीर या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात.

अशा बाल महोत्सवामधून त्या यशस्वी जीवनासाठी मिळत असतात. त्यासाठी पुस्तके वाचा, मैदानी खेळ खेळा, असा संदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी दिला.

महिला व बाल विकास विभाग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जाधव यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लीनाथ कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, बाल न्याय मंडळाच्या सदस्य ॲड. विनया घाग, बाल कल्याण समिती सदस्य ॲड. रजनी सरदेसाई, ॲड. प्रिया लोवलेकर, शिरीष दामले आदी उपस्थित होते.

न्या. जाधव म्हणाले, मुलांचा केवळ बौद्धिक विकास करून चालणार नाही, तर त्याबरोबरच शारीरिक, मानसिक विकासासाठी त्यांच्यामधील कला, क्रीडा, कौशल्य अशा सुप्त गुणांना वाव अशा महोत्सवाच्या माध्यमातून शासनामार्फत दरवर्षी केला जातो. या बाल महोत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे मुलांना भाग घेण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी महिला व बाल विकास प्रयत्न करीत असतो. अशा महोत्सवामधून भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची ऊर्जा मिळत असते. मैदानी खेळ, सांघिक खेळ खेळायला हवेत. त्यामधून एकमेकांचा आदर ठेवून खिलाडूवृत्ती वाढीस लागण्यास मदत होते. हार-जितीपेक्षा या महोत्सवात हिरिरीने भाग घेता हे सर्वांत महत्त्वाचे आहे. असे सांगून महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे त्यांनी कौतुक केले.

जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. अंबाळकर म्हणाले, मुलांना घडविणे हे शिक्षकांचे व पालकांचे काम आहे. त्यांच्या बौद्धिक तसेच शारीरिक क्षमतेचा विकास करणे, त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देणे, यासाठी अशा बाल महोत्सवांची आवश्यकता आहे. मुलांनी अशा महोत्सवामध्ये सहभागी होणे हे जास्त आनंददायी आहे.

सुरुवातीला राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि चाचा नेहरु यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर हवेमध्ये फुगे सोडून आणि मुलांची तसेच मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेने प्रत्यक्षात बाल महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 07-01-2026