Sangameshwar : माखजनात १ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा

संगमेश्वर : तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन, अॅड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद येथे जिल्हास्तरीय, आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष वर्ष आहे. गत दोन वर्षी झालेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाला होता.

प्रशालेतील कै. पांडुरंग सिताराम लघाटे संगीत कक्षाच्या माध्यमातून ही स्पर्धा होत आहे. ह्या स्पर्धेची अंतिम फेरी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गुरुदक्षिणा सभागृहात रंगणार आहे. यावेळी संगीत क्षेत्रातील ख्यातनाम व अभ्यासू व्यक्ती परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ह्या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑफलाईन पद्धतीने व्हिडिओ मागवून करण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपला व्हिडीओ जास्तीत जास्त ६ मिनिटाचा नमूद केलेल्या क्रमांकावर पाठवायचा आहे. ही स्पर्धा २ गटात होणार आहे. लहान गटात ५ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी भाग घेऊ शकणार आहेत. यासाठी प्रथम क्रमांकास ४ हजार, द्वितीयस २ हजार ५००, तृतीयस १ हजार ५०० व उत्तेजनार्थ येणाऱ्यास ५०० रुपये व प्रत्येकी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तर मोठ्या गटात नववी ते बारावी या वर्गातील विद्यार्थी भाग घेऊ शकणार आहेत यातील प्रथम क्रमांकास ५ हजार, द्वितीयस ४ हजार, तृतीयस ३ हजार, उत्तेजनार्थ येणाऱ्यास १००० व प्रत्येकी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत भाग घेणाऱ्याने १८ जानेवारी पर्यंत व्हिडिओ पाठवायचे आहेत. अंतिम फेरीसाठी निवड होणाऱ्या स्पर्धकांना २६ जानेवारी पर्यंत कळवण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतून प्राथमिक गटात ७ व मोठ्या गटात ७ स्पर्धक अंतिम स्पर्धेसाठी निवडण्यात येणार आहेत. व्हिडीओ मध्ये नाट्यसंगीत वगळून, अभंग, भावगीत, भक्तिगीत आदी एका प्रकारातील गीत सादर करावे. असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या स्पर्धेतील अधिक माहितीसाठी व व्हिडीओ पाठवण्यासाठी संतोष कुलकर्णी (९८५०९९१२५५), ओंकार नामजोशी (९८२२४११३३१), ओंकार मूळये (७७४१०८१२११) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्था अध्यक्ष किशोरकुमार साठे, स्पर्धा प्रमुख दीपक पोंक्षे, मुख्याध्यापक महादेव परब, इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद च्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 07/Jan/2026