रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २० जानेवारी रोजी १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ वा प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.
जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आगामी काळात सण, उत्सव साजरे केले जाणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनातर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांच्या तसेच विषया संदर्भात विविध कार्यक्रम घेतले जातात. ६ जानेवारी रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी, १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जन्मदिन, पारसी शेहरेवार मासारंभ, १३ जानेवारी रोजी भोगी, १४ जानेवारी रोजी मकरसंक्रात, १६ जानेवारी रोजी छत्रपती संभाजी राजे राज्यभिषेक दिन, मेरु त्रयोदशी साजरा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात खेड, चिपळूण, अलोरे-शिरगांव, रत्नागिरी, जयगड तसेच देवरुख या ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून या अनुषंगाने स्थानिकांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारले जाते. तसेच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रम घेतले जातात. राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्य आंदोलन केले जाते.
आगामी काळात जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सामाजिक संघटना व राजकीय पक्ष पक्ष वाढीसाठी दौरे तसेच सभा घेत असून त्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जावू शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.
शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना। विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.
अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच आदी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 07/Jan/2026














