चिपळूण : नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिलीच कौन्सिल सभा १२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे. या महत्त्वाच्या सभेत उपनगराध्यक्ष, तसेच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
नगरपालिका शिवसेना आणि भाजपचे संख्याबळ बहुमतात असल्याने उपनगराध्यक्षपद या दोन्ही पक्षांपैकी एकाकडे जाणार असून, बहुधा भाजपला उपनगराध्यक्षपद दिले जाणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, स्वीकृत सदस्यांमध्ये शिवसेनेचा एक, भाजपचा एक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एक सदस्य असा समावेश असणार आहे. शिवसेनेकडून विकी लवेकर यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. भाजपकडून अद्याप कोणाची निवड होणार, याबाबत स्पष्टता नाही. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून माजी नगरसेवक फैसल कासकर व बाळा कदम यांची नावे चर्चेत आहेत. १२ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या कौन्सिल सभेकडे शहराचे राजकीय लक्ष लागून राहिले आहे, कारण याच सभेत नगरपरिषदेतील सत्तेची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 07/Jan/2026














