Ratnagiri : ढगाळ हवामानामुळे आंबा पिकावर कीडरोग, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

रत्नागिरी : पाऊस लांबला तरी कडाक्याच्या थंडीमुळे यावर्षी फुलोरा चांगला आला आहे. मात्र, नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून हवामानात थोडा बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असून, ढगाळ हवामान आहे. शिवाय दव मोठ्या प्रमाणावर पडत आहे. त्यामुळे कीडरोग, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

यावर्षीही पाऊस लांबल्याने जमिनीत मोठ्या प्रमाणावर ओलावा होता. ऑक्टोबर हिट जाणवलीच नसल्यामुळे झाडे पालवीकडे वर्ग झाली होती. मात्र, डिसेंबरमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे मोहर प्रक्रिया सुरू झाली व चित्रच पालटले. सध्या ८० टक्के झाडांना फुलोरा आला आहे. फुलोरा भरपूर असला तरी फळधारणेचे प्रमाण अत्यल्प आहे. अवघ्या २० टक्के झाडांना कणी ते वाटाणा या आकाराची फळे आहेत. फुलोऱ्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव अधिक आहे. सध्या तुडतुडा नियंत्रणात असला तरी ढगाळ हवामानामुळे पुन्हा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. शिवाय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांना सतत निरीक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्या लागत आहेत.

दवामुळे बुरशीची शक्यता
सध्या दव भरपूर प्रमाणात पडत आहे. दव मोहर/फुलोऱ्यात साचत असल्याने ओलावा जास्त वेळ टिकतो. त्यामुळे कणी ते वाटाणा आकाराची फळे आहेत ती गळण्याचा धोका आहे. ओलाव्यामुळे मोहरही काळपट पडण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:40 PM 07/Jan/2026