Mandangad : घराचे बांधकाम सुरू असलेल्या देव्हाऱ्यातील सोन्याच्या मूर्ती लंपास

मंडणगड : तालुक्यातील दुधरे येथे घराचे बांधकाम सुरू असताना देव्हाऱ्यातून सोन्याच्या दोन मौल्यवान मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ६७ वर्षीय दिलीप बाबुराव दळवी (रा. दुधरे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दळवी यांचे दुधरे येथील जुने घर मोडून त्याच जागेवर नवीन घराचे काम सुरू आहे. घराचे बांधकाम सुरू असताना त्यांनी आपला देव्हारा चौथऱ्यावर मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत ठेवला होता.

५ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.३० ते ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या देव्हाऱ्यातून सुमारे ८.५ ग्रॅम वजनाची सोन्याची तुळजाभवानी देवीची मूर्ती आणि ८.५ ग्रॅम वजनाची सोन्याची धारेश्वरी देवीची मूर्ती, असा एकूण १,८४,९५५ रुपये किमतीचा ऐवज लबाडीच्या इराद्याने चोरून नेला. या घटनेची रीतसर तक्रार ६ जानेवारी रोजी दुपारी १२.२५ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 07/Jan/2026