Khed : आय.सी.एस. महाविद्यालयाचा क्रिकेट संघ कोकण विभागीय स्पर्धेसाठी पात्र

खेड : सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी सादर करत कोकण विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी जिल्हा अंतर्गत लांजा येथे आयोजित या स्पर्धेत आय.सी.एस. महाविद्यालयाच्या संघाने सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना न करता उल्लेखनीय विजय मिळवले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पहिल्या सामन्यात आय.सी.एस. महाविद्यालयाचा सामना फिनोलेक्स महाविद्यालय, रत्नागिरी विरुद्ध झाला. नाणेफेक जिंकून फिनोलेक्स संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला उतरलेल्या जो. रुबेनसन परदेशीने तुफानी खेळी साकारत फक्त ७९ चेंडूंमध्ये नाबाद १६८ धावा करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अक्षरशः नामोहरम केले. त्यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर आय. सी. एस. महाविद्यालयाने २० षटकांत ७ बाद २११ धावांचा डोंगर उभारला.

या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना फिनोलेक्सचा संघ २० षटकांत केवळ १७२ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि आय.सी. एस. महाविद्यालयाने ४२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही आय. सी. एस. च्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरले.

दुसरा सामना नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी विरुद्ध खेळवण्यात आला. या सामन्यात आय. सी.एस. महाविद्यालयाच्या गोलंदाजांनी अप्रतिम भेदक मारा करत प्रतिस्पर्धी संघाचा संपूर्ण डाव ७३ धावांत गुंडाळला. पार्थ घागने २ बळी, श्रीजय आंब्रे व अब्दुल गणी यांनी प्रत्येकी १ बळी, तर जो. रुबेनसन परदेशीने या सामन्यातही ४ महत्त्वाचे बळी घेत आपली अष्टपैलू कामगिरी कायम राखली. ७४ धावांचे सहज लक्ष्य आय. सी. एस. महाविद्यालयाने अवघ्या ५ षटकांत बिनबाद ७५ धावा करत पूर्ण केले. सलामीवीर फैसल पारकरने ५ चेंडूंमध्ये ८ धावांचे योगदान दिले, तर जो. रुबेनसन परदेशीने पुन्हा एकदा आपली सामनावीर कामगिरी सिद्ध करत केवळ २४ चेंडूंमध्ये नाबाद ६४ धावा करून संघाला विजयाकडे नेले.

दोन्ही सामन्यांमधील प्रभावी कामगिरीमुळे आय. सी. एस. महाविद्यालयाचा क्रिकेट संघ कोकण विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. संघाच्या यशामागे प्रा. रोहित कांबळे यांचे सूक्ष्म मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंदराव भोसले, प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 07/Jan/2026