दापोली : दापोली शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलली असून शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला तसेच पदपथांवर उभारलेली दुकाने व अडथळे हटविण्यात येणार आहेत.
शहरातील अनेक ठिकाणी पदपथांवर दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून त्यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडे वारंवार प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपंचायत प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, नगरपंचायत हद्दीतील रस्ते, गटारे व फुटपाथवर करण्यात आलेले अतिक्रमण कोणतीही स्वतंत्र नोटीस न देता हटविण्याचा अधिकार प्रशासनाकडे आहे.
संबंधित दुकानदारांनी १२ जानेवारीपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा त्यानंतर अचानक कारवाई करण्यात येईल. कारवाईदरम्यान होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस नगरपंचायत जबाबदार राहणार नसल्याचेही नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच न्यायालयीन स्थगिती असलेल्या खोकेधारकांनीदेखील दुकानासमोरील वाढीव बांधकाम, छप्पर किंवा फुटपाथवरील अडथळे तत्काळ काढून टाकावेत, असा इशारा देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 08/Jan/2026














