Ratnagiri: कीर्तनसंध्या महोत्सवाला प्रारंभ

रत्नागिरी : राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांच्या राष्ट्रीय व ऐतिहासिक विषयांवरील कीर्तनांच्या १५व्या कीर्तनसंध्या महोत्सवाला अपूर्व उत्साहात प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे प्रारंभ झाला. अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी विद्यावाचस्पती चारूदत्तबुवा आफळे यांनी रसाळ, सुश्राव्य वाणीतून महाभारत (उत्तरार्ध) विषय उलगडायला सुरुवात केली. यावेळी पितांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, उद्योजक जयंत देसाई, रत्नागिरीचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील, कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी प्रमुख उपस्थित होते. ब्रह्मवृंदाच्या मंत्रपठणानंतर भारावलेल्या वातावरणात कीर्तनाला सुरुवात झाली. यावेळी सुशील कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी ते म्हणाले की, कीर्तनसंध्या महोत्सवातून होत असलेल्या जागरामध्ये तरुणपिढीचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग कौतुकास्पद आहे. मध्यांतरात पितांबरी उद्योगसमूहाचे रवींद्र प्रभुदेसाई यांचा आफळेबुवांच्या हस्ते योगेश्वर श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. बुवांना तबलासाथ केदार लिंगायत, पखवाज मंगेश चव्हाण, ऑर्गन चैतन्य पटवर्धन, व्हायोलिन उदय गोखले, तालवाद्य हरेश केळकर, बासरी मंदार जोशी यांनी केली. निबंध कानिटकर यांनी निवेदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 08-01-2026