देवरुख : शहरातील प्रसिद्ध सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात देवरुख पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीस नांदेड येथून अटक करण्यात आली असून, अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या आता ९ झाली आहे. शुभम दत्ता सुनेवाड (रा. वसरणी, ता. जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री देवरुख पोलिसांच्या पथकाने नांदेड येथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. देवरुख येथील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांचे १७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास देवरुख-साखरपा मार्गावरील वांझोळे परिसरातून अपहरण करण्यात आले होते.
अज्ञात आरोपींनी केतकर यांच्याकडील सुमारे १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम लुटून त्यांना वाटूळ येथील पुलाखाली सोडून दिले होते. या गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यासाठी रत्नागिरी अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा तसेच लांजा व देवाख पोलिस ठाण्यांच्या पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या ८ दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तपासादरम्यान साखरपा येथील दोन स्थानिकांवर संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात हे अपहरण रॅकेट मुंबई ते बदलापूरपर्यंत कार्यरत असल्याचे उघड झाले. टप्प्याटप्प्याने ८ आरोपींना अटक केले होते. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी नांदेड येथे असल्याची माहिती देवरुख पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत शुभम सुनेवाडला अटक केली. आरोपीची सखोल चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम देवरुख पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. या चौकशीतून आणखी पसार आरोपी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 08/Jan/2026














