राजापूर- लांजा तालुका नागरिक संघाचे ११ वे ग्रामीण साहित्य संमेलन रंगणार रिंगणे गावी

लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या वतीने आयोजित अकरावे ग्रामीण साहित्य संमेलन हे लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील रिंगणे या गावी ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार व लोकसत्ताचे माजी संपादक कुमार केतकर हे भूषवणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय किर्तीचे सतार वादक विदुर महाजन यांचे सतार वादन हे या कार्यक्रमाचे ठरणार खास आकर्षण ठरणार असल्याची माहिती संघाच्या वतीने बुधवारी ७ जानेवारी रोजी लांजा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईच्या वतीने गेली १० वर्षे लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यात ग्रामीण साहित्य संमेलने घेण्यात येत आहेत. या साहित्य ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उदयोन्मुख आणि नविन लेखक, कवी व कलाकार यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ऐतिहासिक व सौंदर्यपूर्ण पर्यटन स्थळे प्रकाशात आणणे, त्या निमित्ताने त्या परिसराच्या विकासाला चालना देणे हे संघाचे उद्देश आहेत.

या ग्रामीण साहित्य संमेलना बाबत माहिती देताना राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी सांगितले की, या साहित्य संमेलनांतर्गत शुक्रवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० रांगोळी प्रदर्शन, १० ते १२ पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सायंकाळी नदीजल पूजन त्यानंतर रात्री ८ वाजता चौथरा हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

शनिवारी दिनांक १ फेब्रुवारी हा संमेलनाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडीला सुरुवात होईल. त्यानंतर दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी दोन ते तीन या वेळेत मुलांच्या एकांकिका स्पर्धा होणार असून तीन ते चार या वेळेत मुलांचे कथाकथन व भाषणे होतील. सायंकाळी चार ते पाच या वेळेत मराठी भाषा आणि तिचा इतिहास या विषयावर प्रख्यात वक्ते श्री कुलकर्णी यांचे व्याख्यान आणि परिसंवाद होणार आहे. सायंकाळी पाच ते सहा या वेळेत परीसंवाद- कोकण संस्कृती या विषयावर परिसंवादाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये डॉक्टर निधी पटवर्धन, डॉ. पार्थ काळे, ऋषिकांत राऊत, रामदास खरे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी सहा ते सात या वेळेत सचिन करडे यांचे शिवचरित्र कार्यक्रम होईल. सायंकाळी ७.३९ ते रात्री ८.३० या वेळेत स्थानिक कवी संमेलन होणार असून त्यानंतर निमंत्रितांचे काव्य संमेलन पार पडणार आहे. रात्री १० ते ११.३० या वेळेत प्रख्यात सतार वादक काय विदुर महाजन यांचे सतार वादन आणि दिनेश मोरे हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.

रविवार दिनांक १ फेब्रुवारी सकाळी सात वाजता उद्घाटन समारंभ पार पडणार असून त्यानंतर मुलांच्या एकांकिका फॅशन शो असे कार्यक्रम होतील. तसेच पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यामध्ये ९० पार ज्येष्ठांचा सन्मान, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईकर यांची मुलाखत, कोकण भूषण पुरस्कार वितरण सोहळा, जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा त्याचप्रमाणे रांगोळी, पाककला स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि इतर पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

तसेच नववधु सन्मान सोळा देखील यावेळी पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेला संघाध्यक्ष सुभाष लाड यांच्यासह संघाचे अमर खामकर काशिनाथ चव्हाण संजय अहिरे गणपत शिर्के, स्नेहल आयरे बाळकृष्ण चव्हाण विजय आयरे विजय हटकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 08/Jan/2026