खेड शहरातील मुख्य रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीच्या कामाला वेग

खेड : शहरातील नानानानी पार्क (सुरेंद्र इंजिनिअर्स) पासून दापोलीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात आली आहे. वाढती वाहतूक, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांचा विचार करून ही कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. खेड या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन पाहणी केली. एकविरा नगर परिसरात नाल्यांच्या अडथळ्यांमुळे पावसाळ्यात वारंवार पाणी साचून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह व्यापारी व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

पाहणीदरम्यान पर्यायी मार्गांची आखणी, नाल्यांचे रुंदीकरण, जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करणे तसेच सुरू असलेल्या कामांना अधिक गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कामकाजाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनी दिल्या.

या पाहणीवेळी शहरप्रमुख कुंदन सातपुते, गटनेते निकेतन पाटणे, उपशहरप्रमुख तुषार सापटे, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, मुख्याधिकारी महादेव रोडगे, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच एसएमसीचे अधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या सहकायनि ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 08/Jan/2026