राजापूर : राजापूर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे प्रतापगड शिवस्मरण यात्रा गडदुर्ग मोहीम यशस्वीपणे पार पडली. या यात्रेत राजापुरातील चार वर्षाच्या शिलेदारापासून ६५ वर्षांच्या एकूण ५४ शिलेदारांनी सहभाग घेतला होता. ही प्रतापगड चढाई मोहीम शिलेदारांनी यशस्वी केली.
राजापुरातील शिवतीर्थावर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा शिलेदार आणि नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शिवस्मरण यात्रा, गडकोट मोहिमेची २ जानेवारी रोजी रात्री १० वाजता सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी या मोहिमेचा प्रमुख अभिजित नार्वेकर यांच्या हस्ते शिवस्मारक येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीदेव चव्हाटा या ठिकाणी विवेक गुरव यांनी ही मोहीम निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून श्रीफळ वाढवून प्रार्थना केली. यावेळी मोहिमेवर जाणा-या दुर्गवीरांना शुभेच्छा देण्यासाठी विनोद गादिकर, दिलीप गोखले, रुपेश शेलार, संदीप देशाई, विनय गादिकर, संदेश टिळेकर, पंकज बावधनकर, सुभाष मयेकर, ज्योती नार्वेकर आदी अनेक शिवप्रेमी शिवतीर्थावर हजर होते. यावेळी हर हर महादेव आणि शिवरायांच्या घोषणांनी शिवतीर्थ दणाणले.
३ जानेवारी रोजी पहाटे वाडा कुंभरोशी या गावात ही शिवस्मरण यात्रा पोहोचली. त्यानंतर ऐतिहासिक रडतोंडी घाटवाटेच्या मागनि या यात्रेला सुरुवात करण्यात आली. याठिकाणी ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र म्हणण्यात आला व शिवरायांचा जयजयकार करत जावळीचे खोऱ्यात सर्व शिलेदारांनी प्रवेश केला. या रडतोंडीच्या घाट वाटेने पुढे पारगावातील गोगाळवाडीतील श्री रामवरदायिनी मंदिरात दर्शन घेऊन पुढे शिवकालीन पूल पाहून मोहिमेतील सर्व शिलेदारांनी प्रतापगडाकडे कूच केले. यानंतर खऱ्या अर्थाने या मोहिमेचा खडतर टप्पा सुरु झाला. जावळीच्या चंद्रराव मोरेंचा पाडाव करण्यासाठी ज्या भोरप्याच्या डोंगरावरून येणाऱ्या वाटेचा शिवाजी महाराजानी वापर केला होता त्या मागनि प्रतापगडाकडे प्रस्थान करण्यात आले. अतिशय खडतर मार्गाने वाटचाल करत निघालेली ही शिवस्मरण यात्रा प्रतापगडाच्या पायथ्याशी येवून पोहोचल्यानंतर गडाच्या ५०० पायऱ्या चढून मोहिमेतील सर्व शिलेदार प्रताप गडावर पोहोचले.
यानंतर प्रतापगडाची शिवकालीन पार्श्वभूमी आणि छत्रपती शिवरायांनी शिवप्रताप करत केलेला अफजल खानाचा वध याबाबत जाणकारांनी माहिती दिली. गडावरील स्वयंभू केदारेश्वर मंदिर, श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर, श्री दत्त मंदिर, हनुमान मंदिर, वेताळ मंदिर, छत्रपती शिवरायांचा वाडा येथील शिवस्मारक व शिवप्रभूचा अश्वारूढ पुतळा, तळी, चोर दरवाजा, शिवकालीन शस्त्रे, तटबंदी, सूर्य बुरूज, रेडका बुरूज, यशवंत बुरूजआदी ठिकाणांना भेटी दिल्या. यानंतर सर्व दुर्गवीर शिलेदारांनी रात्री १० वाजता गडदेवतांना स्मरून, शिवप्रभूना वंदन करुन गडावरून परतीच्या प्रवासासाला सुरुवात केली. या मोहिमेचे नेतृत्व अभिजित नार्वेकर याने केले. मंदार बावधनकर, संदीप मसुरकर, मोहन घुमे, विवेक गुरव, विनोद पवार, निकेश पांचाळ, प्रसन्न देवस्थळी, निखिल चव्हाण, प्रतीक मयेकर यांनी या मोहिमेतील सर्व नियोजन पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 08/Jan/2026














