Ratnagiri: कंत्राटी आरोग्य कर्मचारी अखेर सेवेत नियमित; जिल्ह्यातील २४४ कर्मचाऱ्यांना लाभ

रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्यसेवेत सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याचा अध्यादेश राज्यशासनाने काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ८०३ कर्मचाऱ्यांचे भवितव्य सुरक्षित होणार आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील २४४ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. १४ मार्च २०२४ पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांची सलग दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा झालेल्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागांतील प्राथमिक आरोग्यकेंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच विविध आरोग्य योजनांमध्ये हे कर्मचारी सेवा करत आहेत तसेच एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना समायोजन झाल्यानंतर एका वेतनवाढीचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, अधिपरिचारिका, वैद्यकीय अधिकारी (आयुष) कार्यक्रम सहायक, लेखापाल, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रमाधिकारी, कायदेविषयक सल्लागार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि क्षयरोग पर्यवेक्षक या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सेवेत समाविष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे त्यांच्या मिळणाऱ्या मानधनाइतके किंवा त्यापेक्षा जास्त तसेच नियमित वेतनश्रेणी पुढील तीन टप्प्यांवर निश्चित केली जाणार आहे.

दीड वर्षापासून प्रतीक्षा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या निर्णयाची गेल्या दीड वर्षापासून प्रतीक्षा होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 09-01-2026