Krushi Mahotsav : चिपळुणातील कृषी महोत्सवाची आज सांगता

चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवाला कोकणवासीयांची अलोट गर्दी होत आहे. पशुधन पाहण्याबरोबरच या पशुधन, पाककला स्पर्धांना ही प्रतिसाद मिळत आहे. रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ९ जानेवारी रोजी कृषी महोत्सवाची सांगता होणार आहे.

वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पातर्फे बहादूरशेखनाका येथील सावरकर मैदानावर ५ जानेवारीपासून भव्य दिव्य स्वरूपात कृषी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या महत्त्वाच्या पहिल्या दिवसापासूनच कोकणवासीयांची गर्दी होत आहे. मंगळवारी पशुधन स्पर्धा झाली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. जास्त दूध देणारी म्हैस आणि गाय, सुदृढ निरोगी बैल व रेडा अशा वेगवेगळ्या प्रकारात ही स्पर्धा झाली. प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र आणि सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र ९ जानेवारी रोजी दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सुधीर कानसे, युवराज शेट्ये, डॉ. बालाजी डोंगरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

या प्रदर्शनास जगातील सर्वात कमी उंचीची राधा म्हैस, बैलगाडा शर्यतीमधील विजेता बैल राजा, शेतकरी विलास कांबळे यांचा सोना रेडा आणि अनेक स्पर्धांमधील विजेता सोना रेडा त्याचप्रमाणे दापोली येथील शेतकरी रमेश पाटील यांचा बकासुर बैल याच्या चार किलो वजनाचा कोंबडा, टर्की कोंबडा, परदेशी पोपट, अमेरिकन बकरी, पांढरी शुभ्र उमदे घोडे, लातूर येथील शेतकरी केरबा शिंदे यांचा वळू, लाल कंधारी जातीच्या गायी, खेड येथील शेतकरी अनिकेत महाडिक यांची सुंदरी म्हैस असे आगळे वेगळे पशुधन असल्याने पशु व कृषी प्रेमींची गर्दी पाहायला मिळत आहे.

कृषी महोत्सवाला ग्रामीणचा लूक
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ‘चिक्या आणि सर्जा’ तर चौथ्या दिवशी ‘वेगाचा शेवट सर्जा’ या बैल जोडयांनी कृषी महोत्सवात खास रंगत आणली. प्रदर्शनातील एका खास प्लॅटफॉर्मवर ‘चिक्या- सर्जा वेगाचा शेवट सर्जा’ सर्वांना दर्शन देत होते. या नामवंत बैल जोड्यांची छबी टिपण्यासाठी गर्दी झाली होती. या बैल जोड्यांचे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी स्वागत केले. या बैल जोडयांनी प्रदर्शनात दमदार एन्ट्री करताच एकच जल्लोष झाला. यानिमित्ताने बैलगाडा शर्यतीमधील नामवंत पशुधन पाहण्याची कोकणवासीयांना संधी मिळाली आहे. कृषी महोत्सवात रक्तदान शिबिरात सुमारे १३४ दात्यांनी रक्तदान केले. संजीवनी सर्जिकल अँड जनरल हॉस्पिटलचे डॉ. अक्षय यादव व सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिरात महत्वपूर्ण योगदान दिले. काही मोठ्या शस्त्रक्रियांवरील खर्चात रुग्णांना सवलत देखील दिली जाणार आहे. कृषी महोत्सवात गोड व तिखट पाककला स्पर्धा पार पडली.

आज सादर होणार …. आवारा हूँ!
९ रोजी अखेरच्या दिवशी कला दिग्दर्शक अशोक हांडे निर्मित ‘आवारा हूं’ हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या गाजलेल्या हिंदी सिनेमातील गीते यावेळी सादर होणार आहे. या महोत्सवात पहिल्या दिवशी संतांची वारी रंगली. मावळ्यांच्या जीवनावर आधारित नृत्य नाट्य अभिनयातील रोमांच अण्णाला कार्यक्रम सादर झाला. अवधूत गुप्ते यांनी या कृषी महोत्सवात रंग भरला. समारोप कार्यक्रमला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 09/Jan/2026