‘सत्संगती’तून मानवी जीवनाचे कल्याण : ह.भ.प. डॉ. मनोहर गोरे

राजापूर : शहरानजीनच्या मौजे शीळ येथे वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पाचवा ‘अखंड हरिनाम सप्ताह’ मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

लोकांमधील व्यसनाधीनता दूर व्हावी, संसारिक जीवनात अध्यात्माची ओढ निर्माण व्हावी आणि मानवाने भक्तीमार्गाच्या बळावर संकटांवर मात करावी, या उदात्त हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नागरेकर यांच्या विशेष पुढाकारातून दरवर्षी हा सोहळा शीळ येथे आयोजित केला जातो. यावर्षी शनिवारी सद्गुरू ह. प. प. विश्वनाथ तथा भाई महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक दिवशीय आध्यात्मिक उत्सव पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी माऊलींच्या प्रतिमा पूजनाने आणि मंगल आरतीने झाली. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. त्यामध्ये सकाळच्या सत्रात मौजे शीळ वारकरी संप्रदाय मंडळाचा सामूहिक हरिपाठ आणि आंगले सरवणकरवाडी येथील मंडळाचे वारकरी भजन झाले.

दुपारच्या सत्रात ह. भ. प. भाईमहाराज गोसावी यांनी आध्यात्मिक प्रवचनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी संसारिक जीवनाला हरि भक्तीची जोड किती महत्वाचे आहे हे विशद केले. त्यानंतर गिरीष विचारे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम तर गोठणे दोनिवडे वारकरी मंडळाचे भजन पार पडले.

सायंकाळच्या सत्रात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि विजय बाईत यांचे प्रवचन झाले. त्यानंतर ह. भ. प. कै. सोनुबुवा कुर्णेकर पायी दिंडी संस्था, भांबेड यांचा भावपूर्ण हरिपाठ पार पडला.

सत्संगती हीच जीवनाची शिदोरी: डॉ. मनोहर गोरे
सप्ताहाची सांगता हर्चे (ता. लांजा) येथील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह. भ. प. डॉ. मनोहर गोरे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने झाली. त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ‘देव वसे चित्ती । त्याची घडावी संगती ।।’ या अभंगाचे निरूपण केले.

डॉ. गोरे आपल्या कीर्तनात म्हणाले की, ‘देव आपल्या सर्वांच्या हृदयात वास करतो, पण त्याची अनुभूती घेण्यासाठी संतांच्या सहवासाची नितांत गरज असते. माणसाने संसारातील भौतिक सुखांची वासना न धरता, संतांच्या चरणांची ओढ धरली पाहिजे. ज्याचे जीवन संतांच्या संगतीत व्यतीत होते, त्याचेच जगणे श्रेष्ठ ठरते.’ त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जसा फुलांच्या सहवासाने मातीला सुगंध लागतो, तसा संतांच्या स्पर्शाने माणसाचे ‘माणूसपण’ उजळून निघते.

जनजागृती आणि समाजप्रबोधन
या सप्ताहाच्या माध्यमातून केवळ भक्तीच नव्हे, तर समाजप्रबोधनावरही भर देण्यात आला. व्यसनांपासून दूर राहून सन्मार्गाने जीवन जगण्याची शिकवण या निमित्ताने देण्यात आली. शीळ दशक्रोशीसह राजापूर तालुक्यातील असंख्य वारकरी भाविक या सोहळ्याला उपस्थित होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण शीळ परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ, शीळच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 19-01-2026