काळ सोकावला! खुद्द उपनगराध्यक्षालाच शिवीगाळ; मग सामान्यांचे काय? रत्नागिरीकरांचा संतप्त सवाल

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेतील (Ratnagiri Municipal Council) भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा धक्कादायक प्रत्यय काल आला. प्रशासकीय राजवटीत झालेल्या कथित ‘शौचालय घोटाळ्या’ची (Toilet Scam) माहिती घेण्यासाठी आणि कागदपत्रे पाहण्यासाठी गेलेले नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर (Samir Tivarekar) यांच्या अंगावर पालिकेचा एक इंजिनिअर (Engineer) धावून गेल्याची संतापजनक घटना घडली आहे. एका लोकप्रतिनिधीलाच जर अधिकारी धमकी देत शिवीगाळ करत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय, असा उद्विग्न सवाल आता उपस्थित होत आहे.

नेमके काय घडले?

भाजपचे (BJP) नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर हे आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. पालिका सध्या ४५ कोटी रुपयांच्या कर्जात बुडाली असताना, हा आर्थिक बोजा सामान्य नागरिकांवर टाकण्याऐवजी, ज्यांनी घोटाळे केले त्यांच्याकडूनच वसुली झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. याच अनुषंगाने, प्रशासकीय राजवटीत झालेल्या शौचालय दुरुस्ती घोटाळ्याची कागदपत्रे पाहण्यासाठी ते आज पालिकेत गेले होते. मात्र, जाब विचारताच संबंधित ‘मुजोर’ इंजिनिअरने अरेरावी करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

‘म्हातारी मेल्याच दुःख नाही, पण…’

या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. “म्हातारी मेल्याच दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये,” या उक्तीप्रमाणे जर लोकप्रतिनिधींवर हात उचलण्यापर्यंत अधिकाऱ्यांची मजल गेली असेल, तर उद्या सामान्य नागरिकाची काय अवस्था होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेवर वेळीच कठोर कारवाई झाली नाही, तर अशा प्रवृत्ती फोफावतील, असे मत रत्नागिरीकर व्यक्त करत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याची ही अवस्था?

राज्यात भाजपचे सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री आहेत. अशा परिस्थितीत खुद्द भाजपच्याच उपनगराध्यक्षाला अधिकारी शिवीगाळ करत असतील, तर हे अत्यंत दुर्दैवी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घटनेची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतली असून, लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

पोलिसांत तक्रार, अधीक्षकांची भेट

या प्रकारानंतर समीर तिवरेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात (Ratnagiri City Police Station) धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तसेच, भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (SP Nitin Bagate) यांची तातडीने भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला आणि संबंधित इंजिनिअरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.