Ratnagiri : मराठी संवर्धन पंधरवड्यानिमित्त मालगुंड येथे आयोजित स्पर्धांना प्रतिसाद

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमांतर्गत कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड शाखेच्या वतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांना मालगुंड परिसरातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.

निबंध स्पर्धांमध्ये गट क्रमांक १ इयत्ता पहिली ते चौथीसाठी विषय माझी आई, माझी शाळा, गट क्रमांक २ इयत्ता पाचवी ते आठवीसाठी विषय माझी माय मराठी, माझा आवडता साहित्यिक, गट क्रमांक ३साठी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विषय अभिजात मराठी भाषेचे महत्त्व, मालगुंड कवितेची राजधानी, गट क्रमांक ४ खुलासाठी विषय मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण, पुस्तकांचे गाव : महत्व व गरज असे होते.

वक्तृत्व स्पर्धेसाठी गट क्र. १ शालेयसाठी विषय माझी शाळा आणि मराठी, सक्तीची मराठी भाषा व शाळांमधील वास्तव, वाचाल तर वाचाल, गट क्रमांक २ -खुलासाठी विषय अभिजात मराठी भाषा गरज आणि महत्व, पुस्तक माझे मार्गदर्शक, आधुनिक मराठीचे जनक कवी केशवसुत अशा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा यशस्वितेसाठी मालगुंड येथील कोमसाप शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, सचिव विलास राणे, शुभदा मुळ्ये, रामानंद लिमये, शिरीष लिंगायत, उज्ज्वला बापट आर्दीनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची बक्षिसे आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती कोमसाप मालगुंड शाखेकडून देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 23/Jan/2026