रत्नागिरी : पाच दिवस चालणाऱ्या दीपावलीचा प्रकाशपर्व आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. नवे कपडे, तयार फराळापासून सजावटीच्या साहित्यांची रेलचेल, फेरीवाल्यांच्या स्टॉलवर मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू आणि संपूर्ण परिवारासह दिवाळी खरेदीचा आनंद लुटणारे नागरिक, असे आनंददायी वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. मारुती मंदिर, रत्नागिरी मुख्य बाजारपेठ याच बरोबर रस्त्यालगत भरणारी हंगामी दुकानेही सकाळपासून गर्दीने फुलून जात आहेत.
रत्नागिरीची बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिक बाहेर पडले होते. त्यामुळे बाजारात गर्दी झाली होती. आकाशकंदील, फटाके, रांगोळी, मिठाई, फराळ, कपडे, भेटवस्तूंची खरेदी नागरिकांनी केली. खरेदीसाठी काहीच दिवस राहिल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत रेलचेल होती. शहरातील प्रमुख बाजारपेठेत दुपारनंतर ग्राहकांची गर्दी वाढू लागली होती. सजावटीचे साहित्य, तयार फराळ, पणत्या, लहान मुलांचे कपडे, सुगंधी उटणे, साबण खरेदीसाठी गर्दी होत आहे. ब्रँडेड कपड्यांची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी राम अळी, गोखले नाका आणि राधाकृष्ण नाका गर्दीने फुलला आहे. साड्यांच्या दुकानातही महिलांनी गर्दी केली होती.
विविध प्रकारचे फटाके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून, यावर्षी फटाक्यांच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, तरीही बच्चे कंपनीमध्ये फटाके खरेदीचा उत्साह दिसत होता. कपड्यांच्या खरेदीसह भाऊबीज, पाडव्याला भेटवस्तू देण्यासाठीही खरेदी करण्यात येत आहे. नोकरदार, व्यावसायिक महिलांना फराळाचे सर्वच पदार्थ घरी करणे शक्य नसल्याने बचतगट, मिठाई विक्रेत्यांच्या दुकानातून खरेदी करण्यात येत आहे. दिवाळीच्या सणात विविध आस्थापनांतर्फे भेटवस्तू देण्यात येतात. त्यानिमित्ताने ड्रायफ्रूट बॉक्स, चॉकलेट बॉक्स, मिठाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दररोज रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी राहत असून, ग्राहकांचीही गर्दी होत आहे.
ऑनलाईन खरेदीही जोरात
दिवाळीनिमित्त बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन खरेदीचा पर्याय काहीजणांकडून होत आहे. त्यातच ई-कॉमर्स साईटवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळत असल्याने ऑनलाईन खरेदीचे प्रमाणही वाढले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 29/Oct/2024













