रत्नागिरी: जिल्ह्यात बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली असून, दापोली तालुक्यात ७० जिवंत गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका इसमास अटक केली असून त्याच्याकडून चारचाकी वाहनासह सुमारे २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खेड-मंडणगड रस्त्यावर संशयास्पद हालचाली
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक २८ जानेवारी २०२६ रोजी खेड उपविभागामध्ये पेट्रोलिंग करत होते. सायंकाळी ५.२५ वाजण्याच्या सुमारास खेड-मंडणगड रस्त्यावरील मुगीज येथे एका इसमाच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
७० जिवंत बॉम्ब आणि वाहन जप्त
ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव प्रकाश राम जगताप (वय ३३, रा. शिरखल, ता. दापोली) असे आहे. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता, ७० जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले. हे स्फोटक पदार्थ सार्वजनिक सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने पोलिसांनी ते तत्काळ जप्त केले.
गुन्हा दाखल आणि पुढील तपास
याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५/२०२६ नुसार भारतीय स्फोटक कायदा १९०८ चे कलम ५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ डायल ११२ वर कळवावे.













