पुणे : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एमटीडीसी सज्ज झाले असून पर्यटकांसाठी पर्यटनाची ही शाही मेजवानीच ठरणार आहे. त्यामुळे महामंडळाची पर्यटक निवास आतापासूनच पर्यटकांच्या गर्दीने फुलू लागली आहेत. जास्तीत जास्त पर्यटक पर्यटनासाठी यावेत यासाठी महामंडळाने विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.
सर्व पर्यटक निवासांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात येणार आहे. दीपोत्सव, आकाशकंदील आणि सुंदर रांगोळी काढून दीपावली साजरी करण्यात येणार आहे. सण उत्साहात साजरा करण्याबरोबरच या सणाचे भारतीयांसाठी असलेले महत्त्वही सांगण्यात येणार आहे. गुलाबी थंडीमध्ये आणि निसर्गसंपन्न असलेल्या पर्यटक निवासांमध्ये करण्यात येणार आहे.
महामंडळाने पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी २० टक्के, शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ बुकिंगसाठी १० ते २० टक्के सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी २० खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत.
शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नावीन्यपूर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी निवडक ठिकाणी वाय-फाय सुविधा सुरू केली आहे.
पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा, वेरूळ आणि लोणार या ठिकाणी पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आगाऊ आरक्षण झाले आहे. महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये आणि जागतिक वारसा स्थळांच्या सान्निध्यात दीपोत्सव साजरा करण्याचे आणि त्या निमित्ताने पर्यटकांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा महामंडळाचा मनोदय आहे. त्यानुसार दीपावली आणि दीपोत्सव साजरा करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 29/Oct/2024













