मुंबई : सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी थोडेफार का होईना सोने खरेदी करून त्याचं घरात पूजन केलं, तर घरामध्ये लक्ष्मी नांदते, अशी नागरिकांची भावना आहे.
याच भावनेतून आज धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. देशातली सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारातही सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
या वर्षी सोनं 20 हजारांनी महागलं
सकाळपासूनच आज सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी ही दिसून आली. ग्राहकांच्या गर्दीमुळे सुवर्णनगरी आज चांगलीच गजबजल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वर्षी सोन्याचे भाव हे 60 हजार रुपयापर्यंत होते. हाच भाव आता यावर्षी 81 हजार 600 रूपये झाले आहे. चांदीचा भाव 1 लाख 1500 रूपये असून आज मुहूर्तावर सोना खरेदीसाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
सराफा बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराफा व्यावसायिकांकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षकाच्या डिझाईनमध्ये सोन्याचे दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच लक्ष्मीपूजन लक्षात घेता चांदीची लक्ष्मी, लक्ष्मीचे चांदीचे शिक्केसुद्धा विकायला उपलब्ध आहेत. हे दागिने खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे.
गेल्या वर्षापेक्षा यावेळी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचं बजेट कोलमडले आहे. मात्र थोडंफार का होईना, सोन खरेदी करण्यासाठी महिला ग्राहकांनी सोन्याच्या दुकानात गर्दी केली आहे. दिवाळीनंतर लगेच लग्नसराईन आहे. तेव्हासुद्धा सराफा बाजारात अशीच गर्दी दिसण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 29-10-2024














