देवरुख : देवरुख ते संगमेश्वर मार्गावर कांजिवरा येथील मैत्री पेट्रोल पंपासमोर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या चुकीच्या अंदाजामुळे एसटी बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.
ओव्हरटेक करण्याचा अंदाज चुकला आणि अपघात घडला
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास घडला. आरोपी एसटी बस चालक वैभव रामचंद्र वैद्य (वय ३२, रा. साडवली) हा आपली बस (क्र. MH 14 LX 7147) घेऊन देवडे ते देवरुख या मार्गावरून जात होता. त्याचवेळी समोरून ट्रक (क्र. MH 09 AL 2039) चालक सुबोध शंकर सुर्वे (वय ५८, रा. पाली) हे देवरुखच्या दिशेने जात होते.
कांजिवरा येथील मैत्री पेट्रोल पंपासमोर रस्ता गतीरोधक असल्याने ट्रक चालकाने आपल्या गाडीचा वेग कमी केला. मात्र, पाठीमागून येणाऱ्या एसटी बस चालकाचा ओव्हरटेक करण्याचा अंदाज चुकला. चालकाने बस भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून ट्रकच्या उजव्या बाजूला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत एसटी बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलीस कारवाई आणि गुन्हा नोंद
या अपघातप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन नामदेव कामेरकर (ब. नं. १४३०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून एसटी बस चालक वैभव रामचंद्र वैद्य याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा रजिस्टर नं. १८/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे.
सकाळी कामाच्या घाईत असलेल्या प्रवाशांना या अपघातामुळे मनस्ताप सहन करावा लागला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













