मुंबईहून गावी येण्यास निघालेल्या संगमेश्वरमधील तरुणाचा लांजात मृत्यू; गोळवशी एसटी पिकअप शेडमध्ये आढळला मृतदेह

लांजा : मुंबईहून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघालेल्या संगमेश्वर तालुक्यातील एका ४० वर्षीय तरुणाचा लांजा येथील गोळवशी आंबा स्टॉपवरील एसटी पिकअप शेडमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नितीन चंद्रकांत काबदले असे या मयत तरुणाचे नाव असून, तो गावी पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गावी जाण्याचे सांगून निघाला, पण वाटेतच काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन काबदले (रा. पुर्ये गवळीवाडी, ता. संगमेश्वर) हा मूळचा संगमेश्वरचा रहिवासी असून तो कामानिमित्त मुंबईत राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याने मुंबईतील आपल्या नातेवाईकांना “मी गावी जातो” असे सांगून मुंबई सोडली होती. मात्र, तो त्याच्या मूळ गावी पुर्ये गवळीवाडी येथे पोहोचलाच नाही.

दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजण्यापूर्वी, लांजा तालुक्यातील गोळवशी आंबा स्टॉप येथील एसटी पिकअप शेडमध्ये नितीन हा मयत अवस्थेत आढळून आला. स्थानिकांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. मयत नितीनला दारू पिण्याची सवय होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आकस्मिक मृत्यूची नोंद

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. नितीनच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, लांजा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

याप्रकरणी मयताचा भाऊ (वारस) नितीन चंद्रकांत काबदले यांच्या माहितीवरून लांजा पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ०९/२०२६ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भर तारुण्यात नितीनचा असा अंत झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.