रत्नागिरी : निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी (MJPJAY) राज्य सरकारने अखेर तिजोरी उघडली आहे. मागील जुलै महिन्यापासून प्रलंबित असलेल्या हॉस्पिटलच्या देयकांसाठी सरकारने १ हजार १६२ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णालयांची सुमारे १८ कोटी रुपयांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
जुलैपासूनचा परतावा रखडल्याने रुग्णालये होती अडचणीत
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून दरवर्षी हजारो गरजू रुग्ण मोफत उपचार घेतात. या उपचारांचा खर्च सरकारकडून संबंधित खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांना परताव्याच्या (Claims) स्वरूपात दिला जातो. मात्र, जुलै २०२५ पासून हा परतावा मिळाला नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील अनेक रुग्णालयांनी नाराजी व्यक्त केली होती. रत्नागिरी जिल्ह्याचीच थकबाकी १८ कोटी रुपयांवर पोहोचली होती.
नियमतः या योजनेचा परतावा ४५ दिवसांच्या आत मिळणे आवश्यक असते. मात्र, सहा-सहा महिने पैसे न मिळाल्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांनी या योजनेंतर्गत उपचार करण्याबाबत नकारात्मक भूमिका घेण्यास सुरुवात केली होती. यामुळे सर्वसामान्यांसाठी ‘संजीवनी’ ठरलेली ही योजना धोक्यात येते की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती.
१,१६२ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता
सार्वजनिक आरोग्य विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार, एकूण १,१६२ कोटी ८ लाख ६३ हजार ३२१ रुपये इतका निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी प्राप्त होताच प्रलंबित असलेले रुग्णालयांचे दावे प्राधान्याने निकाली काढले जाणार आहेत. यामुळे रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि योजनेत समाविष्ट असलेल्या खासगी हॉस्पिटलना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.













