चिपळूण (जि. रत्नागिरी): कोकणच्या भूमीत साहित्याचा नवा इतिहास रचला जाणार असून, चिपळूण येथे १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भव्य ‘ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने संस्थेच्या प्रशस्त क्रीडांगणावर हे संमेलन संपन्न होणार आहे. ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सहकारातील मूल्ये साहित्याच्या माध्यमातून मांडणारे हे राज्यातील पहिलेच अभिनव संमेलन ठरणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. संजय भावे, तर प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे काम पाहणार आहेत.
तीन दिवसांचा भरगच्च वैचारिक कार्यक्रम
पहिल्या दिवशी, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ध्वजारोहण व भव्य ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होईल. सायंकाळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आणि स्थानिक कवींचा ‘कवी कट्टा’ रंगणार आहे. दुसऱ्या दिवशी, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खासदार शरद पवार यांच्या हस्ते मुख्य उद्घाटन सोहळा होईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहतील. या दिवशी ‘सहकारातून समृद्धी’ आणि ‘ग्रामीण साहित्यातील कोकण’ या विषयांवर परिसंवाद व कवी संमेलन पार पडेल.
तिसऱ्या दिवशी, १५ फेब्रुवारी रोजी कृषी व सहकार विषयावर विशेष सत्रे होतील. यामध्ये ‘कृषी साहित्य व शेती सुधारणा’ आणि ‘आता आत्महत्या थांबवूया’ हा महत्त्वपूर्ण परिसंवाद तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा मांडल्या जातील.
समारोप सोहळा व उपस्थिती
संमेलनाचा समारोप १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, खासदार सुनील तटकरे व कोकणातील आमदारांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कोकणातील साहित्यिक, शेतकरी, विद्यार्थी व रसिकांसाठी हे संमेलन एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचा परिचय
डॉ. चोरगे हे कृषी, ग्रामीण आणि सहकार क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी जवळपास ५० साहित्यकृतींतून ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडले आहे. कृषी पर्यटनापासून ते सहकार क्षेत्रापर्यंत त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्रगतीपथावर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि विचारांचा लाभ या संमेलनाच्या माध्यमातून सर्व उपस्थितांना मिळणार आहे.













