लांजा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ७ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आसगे, भांबेड, साटवली आणि गवाणे हे चार जिल्हा परिषद गट आणि त्यातील आठ पंचायत समिती गणासाठी १०६ मतदान केंद्र आहेत.
निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपुष्टात आला आहे. लांजा तालुक्यात निवडणूक निरीक्षक म्हणून मनोज रानडे हे काम पाहणार असून, निवडणूक निर्णय अधिकारीपदी वंदना खरमाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार प्रियांका ढोले त्याचप्रमाणे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी हे काम पाहणार आहेत. ४ गट आणि आठ गणातील महिला मतदार हे ३८ हजार २१६ असून, पुरुष मतदारांची संख्या ही ३५ हजार ६७५ इतकी आहे. म्हणजेच एकूण मतदार संख्या ७३ हजार ८९१ इतकी आहे. मतदानासाठी आसगे गटात २८ केंद्र, भांबेड २५ केंद्र, साटवली २५ केंद्र आणि गवाणे गटात २८ केंद्र याप्रमाणे १०६ केंद्र आहेत. त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी १५, मतदान केंद्राध्यक्ष १०६, मतदान अधिकारी नं. १ साठी १०६, मतदान अधिकारी नं. दोनसाठी १०६, मतदान अधिकारी नं. तीनसाठी १०६ तसेच पोलिस कर्मचारी १०६, शिपाई १०६, व्यवस्थापक १०६ अशा एकूण ७५७ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुक्यातील पन्हळे आनंदगाव येथे सखी आणि आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे केंद्रे उभारली आहेत याशिवाय तालुक्यातील सापुचेतळे आणि बोरिवले या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना केली आहे. निवडणुकीसंबंधी सर्व कर्मचाऱ्यांना लांजा न्यू स्कूल या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मतमोजणीसाठी १४ टेबल मतमोजणी ९ रोजी लांजा शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं. ५ या ठिकाणी होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यासाठी १४ टेबल मांडण्यात येणार असून, गट आणि गणनिहाय फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर केला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 06-02-2026













