चिपळूणचे डॉ. यतीन जाधव आयएमएच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या चेअरमनपदी

रत्नागिरी : चिपळूणचे सुपुत्र व सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.

ही नियुक्ती राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी जाहीर केली आहे.

या समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी व मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांचा समावेश आहे. राज्यातील डॉक्टर व रुग्णांच्या हितासाठी तसेच आपत्तीच्या काळात प्रभावी वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. समितीच्या कार्यक्षेत्राबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

डॉ. जाधव कोकणातील सुप्रसिद्ध स्प्रिंग क्लिनिकचे संचालक असून अपरांत मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक आहेत. त्यांनी जिल्ह्यातील अनेक नामवंत औद्योगिक आस्थापनांमध्ये औद्योगिक स्वास्थ्य चिकित्सक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. औद्योगिक स्वास्थ्य व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उत्तम जाणकार व प्रभावी व्यवस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे.

यापूर्वी त्यांनी आयएमए राज्य औद्योगिक स्वास्थ्य समितीचे अध्यक्ष व समन्वयक ही पदे यशस्वीरीत्या भूषवली आहेत. तसेच ते आयएमए चिपळूणचे अध्यक्ष आणि करोना टास्क फोर्सचे कोकण विभाग समन्वयक म्हणूनही कार्यरत होते.

डॉ. जाधव यांची सामाजिक व सांस्कृतिक कारकीर्दही तितकीच उल्लेखनीय आहे. कोकणच्या साहित्य व सांस्कृतिक इतिहासाचा मानदंड असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे ते अध्यक्ष आहेत. सांज सोबत, एकता विकास मंच, आपलं चिपळूण, टच या सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष व कोकण समन्वयक म्हणून कामगिरी बजावली आहे. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणूनही त्यांचे मोलाचे योगदान आहे.

वैद्यकीय व इतर विषयांवरील त्यांचे विचारप्रवर्तक लेख विविध शास्त्रीय व अन्य नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत. ते चिपळूण तालुका खो-खो असोसिएशन व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य चिपळूण शाखेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक व आरोग्यविषयक प्रबोधन उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 07-02-2026