गोवा ते भिवंडी प्रवासात ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात अखेरचा श्वास

रत्नागिरी, संगमेश्वर: गोवा येथून भिवंडीकडे माल घेऊन जाणाऱ्या एका ट्रक चालकाचा प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुर्यकिरण संभाजी धुमाळ (वय ३८, रा. अंजुर फाटा, चर्णेपाडा, भिवंडी) असे मृत चालकाचे नाव असून, त्यांना उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२:०५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

प्रवासातील दुर्दैवी घटनाक्रम
सुर्यकिरण संभाजी धुमाळ हे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी गोवा येथून भिवंडीकडे ट्रक घेऊन जात असताना लांजा येथे त्यांच्या छातीत दुखू लागले. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी चालकाने त्यांना तात्काळ रत्नागिरी येथील परकार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर, अधिक उपचारांसाठी धुमाळ यांच्या नातेवाईकांनी त्यांना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रुग्णवाहिकेतून मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला.

संगमेश्वर येथे उपचारादरम्यान मृत्यू
मुंबईकडे नेत असताना वाटेत सुर्यकिरण धुमाळ यांना पुन्हा तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. तात्काळ त्यांना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सुर्यकिरण धुमाळ यांना मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ०३:३१ वाजता अकस्मात मृत्यू (आमृ.) क्रमांक ०५/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम (BNSS) १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात येणार आहे. ट्रक चालकाच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 07-02-2026