धक्कादायक! रत्नागिरीत क्रिकेटच्या मैदानातच खेळाडूचा मृत्यू; फलंदाजी करत असताना हृदयविकाराचा झटका, घटना कॅमेऱ्यात कैद

रत्नागिरी: खेळपट्टीवर धाव घेणारा आणि आपल्या संघाला विजय मिळवून देणारा एक हरहुन्नरी खेळाडू अचानक काळाच्या पडद्याआड गेला आहे. रत्नागिरीतील चिंचखरी येथे क्रिकेटची मॅच खेळत असताना प्रवीण पवार या खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचखरी येथे स्थानिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवीण पवार यांचा संघ फलंदाजी करत होता. प्रवीण त्यावेळी नॉन-स्ट्रायकर एंडला उभा होता. खेळ सुरू असतानाच अचानक प्रवीणला अस्वस्थ वाटू लागले आणि तो थेट पंचांच्या (Umpire) अंगावर कोसळला.

सुरुवातीला प्रवीणला चक्कर आली असावी, असे मैदानावरील खेळाडू आणि प्रेक्षकांना वाटले. मैदानावरील खेळाडू, पंच आणि आयोजकांनी तातडीने त्याच्या दिशेने धाव घेत त्याला प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला.


थरार लाईव्ह प्रक्षेपणात रेकॉर्ड

ही मॅच स्थानिक पातळीवर लाईव्ह दाखवली जात होती. त्यामुळे प्रवीण मैदानात कोसळल्याचा आणि त्यानंतर खेळाडूंनी केलेली धावपळ असा सर्व थरार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. हा व्हिडिओ पाहून क्रीडा प्रेमींमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

डॉक्टरांनी घोषित केले मृत

प्रवीण प्रथमोपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले असून, हृदयविकाराचा झटका हे निधनाचे प्राथमिक कारण असल्याचे सांगितले आहे.


स्थानिक क्रिकेटमधील चमकता तारा हरपला

प्रवीण पवार हा रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरातील क्रिकेट विश्वात एक ओळखीचा चेहरा होता. स्थानिक स्पर्धांमध्ये त्याने आपल्या खेळाच्या जोरावर नाव कमावले होते आणि अनेकदा आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्या अशा अचानक जाण्याने चिंचखरीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

खेळाच्या मैदानात वाढत्या हृदयविकाराच्या घटना आता चिंतेचा विषय बनत आहेत. तंदुरुस्त दिसणाऱ्या खेळाडूंचा असा मृत्यू होणे, हे क्रीडा क्षेत्रासाठी मोठे नुकसान मानले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 07-02-2026