रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५६ आणि पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी आज, शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, लोकशाहीच्या या उत्सवात तांत्रिक बिघाडाचे मोठे विघ्न पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या अनेक भागांत, विशेषतः चिपळूण तालुक्यात मतदान यंत्रे (EVM) वारंवार बंद पडल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का घसरला
जिल्ह्यात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली, मात्र सुरुवातीच्या दोन तासांत मतदारांचा उत्साह काहीसा कमीच दिसून आला. सकाळी ९:३० वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ ११.४७ टक्के इतकेच मतदान झाले होते. यंत्रातील बिघाड आणि त्यामुळे लागणाऱ्या रांगा हे या कमी मतदानामागचे एक प्रमुख कारण मानले जात आहे.
चिपळूणमध्ये ईव्हीएमचा ‘बिघाड पॅटर्न’
सर्वात वाईट परिस्थिती चिपळूण तालुक्यात पाहायला मिळाली. चिपळुणात तब्बल ४५ मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- खेर्डी गट: या गटातील ४ ते ५ केंद्रांवर मतदान यंत्रे ठप्प झाली होती.
- इतर गावे: शिरगाव, सावर्डे कॉलनी, पिंपळ मोहल्ला, कुडप, गुढेकरवाडी, मांडकी, खरवते, कोंढरताम्हाणे, कापरे, कापसाळ, कळंबस्ते, पेढांबे, पिंपळी, सती-चिंचघरी, कळवंडे आणि मालघर या ठिकाणीही यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाची प्रक्रिया तासनतास रखडली.
दापोली आणि खेडमध्येही गोंधळ
केवळ चिपळूणच नव्हे, तर दापोली तालुक्यातील उटंबर आणि खेड तालुक्यातील बोरज येथेही मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. प्रशासनाकडून पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून देण्यास उशीर झाल्यामुळे अनेक मतदार केंद्रावरून मतदान न करताच माघारी परतले.
मतदारांचा संताप आणि प्रशासनाचे आवाहन
मशीन बंद पडल्यामुळे रांगेत उभे असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांनी प्रशासनाविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “एक तर सकाळची वेळ कामाची असते, त्यात तासभर रांगेत उभे राहूनही मशीन चालत नसेल, तर आम्ही किती वेळ थांबणार?” असा सवाल मतदारांनी उपस्थित केला.
दरम्यान, निवडणूक विभागाने तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले असून, मतदारांनी शांतता राखावी आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 07-02-2026













