रत्नागिरीच्या बाजारात ‘देवगड हापूस’दाखल! डझनाचा भाव काय? जाणून घ्या..

रत्नागिरी: कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा आंबा पीक संकटात असतानाच, देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने जतन केलेला ‘पहीला हापूस’ रत्नागिरीच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. या हंगामातील हा पहिलाच आंबा असल्याचे सांगितले जात असून, त्याच्या दरांनीही सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ऑक्टोबरच्या मोहराची किमया

यंदा पावसाळा लांबल्याने आणि हवामानातील बदलामुळे अनेक ठिकाणी मोहर करपला आहे. मात्र, देवगडमधील एका शेतकऱ्याने ऑक्टोबरमध्ये आलेल्या फुलोऱ्याची अत्यंत मेहनतीने जपणूक केली. कडाक्याची थंडी आणि वाढता उष्मा अशा दुहेरी संकटातून वाचलेला हा आंबा आता पूर्णपणे तयार होऊन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

गोखले नाक्यावर हापूसचे पूजन

रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा विक्रेते सतीश पवार (गोखले नाका) यांच्या स्टॉलवर हा आंबा विक्रीसाठी आला आहे. गेली दोन पिढ्या आंबा व्यवसायात असलेल्या पवार यांनी परंपरेनुसार या पहिल्या आंबा पेटीचे पूजन करून विक्रीला सुरुवात केली. यावेळी रत्नागिरीच्या हापूसपूर्वी देवगडचा हापूस दाखल झाल्याने चर्चा रंगली आहे.

दराचा आकडा ऐकून व्हाल थक्क!

हंगामातील पहिलाच आंबा असल्याने त्याचे दरही ‘राजा’सारखेच आहेत:

  • हापूस आंबा: ४ ते ५ डझनच्या पेटीतील आंब्याला ४,००० ते ६,००० रुपये प्रति डझन इतका विक्रमी दर मिळत आहे.
  • रत्ना हापूस (बिटकी): ही बिटकी देखील विक्रीसाठी उपलब्ध असून तिचा दर ७५० रुपये प्रति डझन आहे.

हंगामावर हवामानाचे सावट

गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहिल्याने ‘ऑक्टोबर हिट’ जाणवली नाही. डिसेंबर आणि जानेवारीत कडाक्याची थंडी पडली, पण त्याने फळधारणा होण्याऐवजी मोहर करपण्याचे प्रमाण वाढले. आता पुन्हा उष्मा वाढल्याने नवीन मोहर येत आहे. हा नवीन आंबा आता थेट एप्रिल आणि मे महिन्यातच मोठ्या प्रमाणावर बाजारात येण्याची चिन्हे आहेत.

वाढत्या उष्म्यामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा बागायतदार चिंतेत असताना, देवगडच्या या हापूसने बाजारात मात्र चैतन्य आणले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 07-02-2026