गुहागर: दारूच्या नशेत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा खाडीत बुडून मृत्यू

गुहागर: तालुक्यातील खाडी परिसरात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एका ५६ वर्षीय प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या दरम्यान घडली.

नेमकी घटना काय?

असलम अब्दुल करीम दळवी (वय ५६, रा. पांगारीतर्फे हवेली भूरकुंडा, गुहागर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, असलम दळवी यांना दारूचे व्यसन होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते दारूच्या नशेतच खाडीत खेकडे पकडण्यासाठी घराबाहेर पडले होते.

मुलाने शोध घेतल्यावर समोर आला प्रकार

दिवस मावळला तरी वडील घरी न परतल्यामुळे त्यांचा मुलगा तोफिर असलम दळवी याने खाडी परिसरात जाऊन शोध घेतला. यावेळी त्याला खाडीच्या पाण्यात वडील मयत अवस्थेत तरंगताना दिसून आले. या घटनेमुळे दळवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीस कारवाई

या घटनेबाबत मुलाने गुहागर पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दारूच्या नशेत तोल गेल्यामुळे किंवा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 09-02-2026