मुंबई: राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालयातून भ्रष्टाचाराचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात छापा टाकून एका लिपिकाला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे मंत्रालयातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकी कारवाई काय?
अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असलेला लिपिक राजेंद्र ढेरंगे याने एका तक्रारदाराचा निलंबित झालेला मेडिकल परवाना पुन्हा पूर्ववत करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. अखेर ३५ हजार रुपयांवर तडजोड झाली आणि ही रक्कम स्वीकारतानाच एसीबीच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला मंत्रालयातील मंत्र्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले.
मंत्र्यांच्या कार्यालयाचा ताबा; पीएच्या नावाचा वापर?
ही कारवाई झाली तेव्हा एसीबीच्या पथकाने काही काळासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला होता. या नाट्यामुळे मंत्रालयाचे कामकाज काही वेळ थांबवण्यात आले होते. प्राथमिक चर्चेनुसार, आरोपी ढेरंगे याने लाच मागताना मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नावाचा वापर केल्याचे बोलले जात आहे, मात्र अधिकृत तपास अद्याप सुरू आहे.
“संबंध सापडला तर राजीनामा देईन” – नरहरी झिरवाळ यांचा इशारा
या प्रकारानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले:
“या प्रकाराला मी कुठेही पाठीशी घालणार नाही. त्याचा मंत्र्यांशी किंवा पीएशी संबंध नाही. त्याने जी हिंमत केली आहे, त्याला आता उत्तर द्यावेच लागेल. जर या चौकशीत माझा कोणताही संबंध सापडला, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन. एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले आहे, त्यामुळे त्याला शिक्षा भोगावीच लागेल.”
राजकीय वातावरण तापले; विरोधकांचा घणाघात
थेट मंत्र्यांच्या दालनात झालेल्या या लाचखोरीच्या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात आता खुलेआम लाचखोरी सुरू आहे,” अशी टीका करत हा प्रकार राज्यासाठी लाजीरवाणा असल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- आरोपी: राजेंद्र ढेरंगे (लिपिक, अन्न व औषध प्रशासन विभाग)
- लाचेची रक्कम: ३५,००० रुपये (तडजोड)
- ठिकाण: मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय, दुसरा मजला, मंत्रालय.
- कारवाई: एसीबीकडून रंगेहात अटक आणि कार्यालय सील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 13-02-2026













