पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मंगळवार, १७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यावर्षी राज्यातील ८,६५० शाळांची नोंदणी झाली असून, एकूण १ लाख १२ हजार ७०६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांना आपल्या पाल्यांचे अर्ज १० मार्चपर्यंत भरता येतील.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत शिक्षणाची संधी
RTE कायद्यानुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया ९ जानेवारीला सुरू झाली होती आणि ३० जानेवारीला बंद करण्यात आली.
पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना व नियम
प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शिक्षण विभागाने काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत:
- शाळांची निवड: पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा पोर्टलवर अर्जासाठी उपलब्ध दिसतील.
- एकच अर्ज ग्राह्य: जर पालकांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आले, तर त्या विद्यार्थ्याच्या एकाही अर्जाचा लॉटरीसाठी विचार केला जाणार नाही.
- अचूक माहिती: अर्जामध्ये चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्यास, प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द केला जाऊ शकतो. पालकांनी अर्जात स्वतःच्या निवासस्थानाचा पत्ता अत्यंत अचूक नमूद करावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:29 16-02-2026














