दोन महिने पुरेल इतका तेलसाठा उपलब्ध; तातडीने दरवाढ नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असले तरी भारतात सध्या दोन महिने पुरेल इतका पुरेसा तेलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत इंधन दरवाढीची कोणतीही भीती नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. बुधवारी विधान परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला.


परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप आणणार

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक भारतीय नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिक तिथे अडकले आहेत. या नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या विषयावर विधान परिषदेत सदस्य संजय केनेकर, निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, अनिल परब आणि शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

सरकारची महत्त्वाची पावले:

  • दूतवासांशी संपर्क: परदेशातील भारतीय दूतावासांना सक्रिय करण्यात आले असून, अडकलेल्या नागरिकांनी दूतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • हवाई वाहतूक: हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यामुळे जे नागरिक ट्रान्झिटमध्ये अडकले आहेत, त्यांच्या संदेशांनंतर परराष्ट्र मंत्रालयाशी तातडीने संपर्क साधला जात आहे.
  • शेतीमाल निर्यात: युद्धामुळे शेतीमाल निर्यातीवर होणाऱ्या परिणामांचा प्रश्न गांभीर्याने घेतला जाईल आणि आवश्यक तिथे हस्तक्षेप केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास

परदेशातील भारतीयांना प्रतिकूल परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढण्याचा केंद्र सरकारकडे मोठा अनुभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असून, सर्व नागरिकांना सुरक्षित परत आणले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 05-03-2026