मुंबई: दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या सीमेवर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे (Anti-Cyclone) आणि उत्तर भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे बुधवारी संपूर्ण कोकणपट्टा अक्षरशः तापला होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात झालेल्या या अचानक वाढीमुळे महामुंबई परिसरातील नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत.
मुंबईचे तापमान ३८ अंशांवर
बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सकाळी हवामान काहीसे दिलासादायक वाटत असले तरी, दुपारनंतर उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली. विशेषतः दुपारी १२ नंतर उष्ण वाऱ्यांचे चटके बसू लागले आणि दुपारी २ ते ३ च्या दरम्यान उन्हाने जिवाची काहिली केली. लोकल आणि बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना या उष्णतेचा मोठा फटका बसला.
पुढील ३ दिवस ‘तापदायक’
हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील तीन दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. ८ मार्चपर्यंत कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट सदृश स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असली तरी उष्ण वाऱ्यांचा प्रभाव कायम राहील.
तापमान वाढीचे मुख्य कारण काय?
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार:
- गुजरातमध्ये निर्माण झालेल्या ‘अँटी-सायक्लोन’ (Anti-Cyclone) मधून उष्ण वारे महाराष्ट्राकडे येत आहेत.
- मार्चची सुरुवातच अशा तीव्र उष्णतेने झाल्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक कडक असण्याची शक्यता आहे.
गेल्या १० वर्षांतील मार्चमधील उच्चांकी तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मार्च महिना मुंबईकरांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास हे स्पष्ट होते:
| वर्ष (मार्च महिना) | तापमान (°C) |
| १२ मार्च २०२५ | ३९.२ |
| २२ मार्च २०२४ | ३८.८ |
| १३ मार्च २०२३ | ३९.४ |
| १५ मार्च २०२२ | ३९.६ |
| २८ मार्च २०२१ | ४०.९ |
| २६ मार्च २०१९ | ४०.३ |
| २६ मार्च २०१८ | ४१ |
| २६ मार्च २०१५ | ४०.८ |
(टीप: २०१८ मध्ये मार्च महिन्यात ४१ अंश इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती.)
नागरिकांसाठी आवाहन
वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हापासून संरक्षणासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 05-03-2026













