लांजा : बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठ येथील दोन घरांना मोठा फटका बसला. दोन घरांचे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पाऊस सायंकाळच्या वेळेत पडत असल्याने वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऐन दिवाळी उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या आठवडाभर पावसाने उघडीप घेतल्याने पावसाने विश्रांती घेतली असे वाटत होते. मात्र बुधवारपासून पुन्हा पावसाने पडायला सुरुवात केली आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून, या पावसाचा फटका महावितरणसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. भातकापणीला सुरुवात झाली असताना पावसाच्या व्यत्ययामुळे कापणी लांबली आहे.
बुधवारी पडलेल्या मुसळधार वादळी पावसाने भांबेड बाजारपेठ येथील दोन घरांचे नुकसान झाले आहे. सिमेंट पत्रे व कौले उडून गेल्याने घरांचे नुकसान झाले आहे. तर वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसामुळे भांबेड येथील शैलजा जयराम गांधी यांच्या घराचे १ लाख ४० हजार रुपये तर विलास परब यांच्या घराचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.
भांबेड मंडल अधिकारी मराठी व कोतवाल विजय दळवी यांनी माहिती घेऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवला. अजूनही परतीच्या पावसाचा फटका लांजा तालुक्याला बसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 02/Nov/2024