रत्नागिरी : घरफोडीतील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शहरातील मारुती मंदिर परिसरातील ओमकार डेव्हलपर्स व स्टार इन्शुरन्स कंपनीची कार्यालये फोडून रोख रक्कम व सीसीटीव्ही डीव्हीआर चोरणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी आवळल्या. या कारवाईमुळे रत्नागिरीतील दोन आणि मुंबई व ठाणे येथील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

स्वप्निल राजाराम मयेकर (३८, मुळ रा. खारघर, जि. रायगड सध्या गेस्ट हाउस, रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो मुंबईतील रेकॉर्डवरील आरोपी असून त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रत्नागिरीतील चोरीला गेलेला मुद्देमाल आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले आहे.

शहरातील या दोन चोऱ्यांनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखोचे एक पथक नियुक्त करुन गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता.

या पथकाने घटनास्थळावरील तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूस असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच गोपनीय माहितीवरुन हे दोन्ही गुन्हे मुंबईतील स्वप्निल मयेकरने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रत्नागिरी इत्यादी ठिकाणी स्वप्निलचा अहोरात्र शोध घेउन त्याला ताब्यात घेतले.

घरफोडीतील सराईत गुन्हेगारावरील ही कारवाई पोलिस निरीक्षक नितिन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, पोलिस हेड कॉस्टेबल विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दीपराज पाटील, शांताराम झोरे, विवेक रसाळ, रमिज शेख आणि पोलिस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.

२० गुन्हे दाखल
आरोपी स्वप्निल मयेकर हा मुंबई व ठाणे येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर या ठिकाणी चोरी, घरफोडीचे सुमारे २० गुन्हे दाखल असून गुजरात व गोवा या राज्यांमध्येही त्याने गुन्हे केलेले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 24/Sep/2024