मुंबई: नीट (NEET) परीक्षेचा पेपर लीक झाल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. “भाजप सरकारला एक परीक्षाही सुरळीत पार पाडता येत नाही,” अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच, या प्रकरणाला जबाबदार धरून राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांची हकालपट्टी करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
२२ लाख कुटुंबियांना नाहक मनस्ताप
हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, नीटची परीक्षा ही केवळ एक परीक्षा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाचे प्रतीक आहे. ३ मे रोजी झालेली परीक्षा आता पेपरफुटीमुळे रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे २२ लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार असून, त्यांच्या कुटुंबांच्या आशा-आकांक्षेचा चुराडा झाला आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर लीक करणारे मोकाट सुटले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा: राजीनाम्याचा विसर पडला का?
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा नीट परीक्षेत गोंधळ निर्माण झाला आहे. २०२४ च्या नीट-यूजी पेपरफुटीच्या वेळीही प्रधान यांनी सुरुवातीला आरोप फेटाळले होते आणि नंतर गैरप्रकार मान्य केले होते. “काँग्रेसचे सरकार असताना भाजप मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असे, पण २०१४ पासून कितीही गंभीर घटना घडली तरी भाजपचा एकही मंत्री राजीनामा देत नाही,” असा टोला सपकाळ यांनी लगावला.
महाराष्ट्रातील ‘SRPF’ भरतीतील गोंधळाचाही उल्लेख
केवळ केंद्रच नव्हे तर महाराष्ट्र सरकारवरही सपकाळ यांनी टीका केली. २ मे २०२६ रोजी झालेल्या SRPF दौंड शिपाई भरती परीक्षेचा दाखला देत ते म्हणाले की, “या परीक्षेतील १०० पैकी ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे विचारण्यात आले. हा सुद्धा स्पर्धा परीक्षेतील मोठा गैरप्रकार आहे. महाराष्ट्रातही पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यास सरकार अपयशी ठरले आहे.”
काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी
देशातील विद्यार्थी आणि पालक या ‘अकार्यक्षम’ सरकारला कधीही माफ करणार नाहीत. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा आहे, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 13-05-2026














