रत्नागिरी : शहरातील कोकणनगर स्मशानभूमीत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर अखेर रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाला जाग आली असून, शिवाजीनगर – चर्मालय स्टॉप, मजगांव रोड येथील स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित गॅस शवदाहिनी दि. २७ मे २०२६ पासून तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार असून, आवश्यक तांत्रिक दुरुस्ती आणि देखभाल पूर्ण झाल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी दिली आहे.
कोकणनगर स्मशानभूमीतील घटनेने संताप
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील कोकणनगर स्मशानभूमीत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने मृतदेह तब्बल सात तास दाहिनीत अडकून पडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
या प्रकारामुळे मृतकाच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला होता. विशेष म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवण्यात आलेला जनरेटर गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची बाब समोर आली होती. इतकेच नव्हे तर, संबंधित अधिकाऱ्यांनाच जनरेटरच्या बिघाडाची माहिती नसल्याचे उघड झाल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
दुरुस्तीअभावी वाढला धोका
स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीच्या चिमणीची दुरुस्ती, जनरेटरची दुरुस्ती तसेच इतर तांत्रिक कामे तातडीने करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा गैरसोय टाळण्यासाठी शवदाहिनी तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
दरम्यान, गॅस शवदाहिनी बंद राहणार असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रत्नागिरी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.














