“तुमच्याकडे पेपर फुटतात, आमच्याकडे मतं!”; पुण्यातील आंदोलनात राज ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबई :
MPSC Protest Pune अंतर्गत पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी अतिशय आक्रमक आणि संवेदनशील भूमिका मांडली. “मी इथं भाषण करायला नाही, तर तुमच्या रागात सामील व्हायला आलो आहे. मराठी मुला-मुलींच्या नोकरी आणि भविष्यासाठी राज ठाकरेला कोणाचेही पाय धरावे लागले तरी मी तयार आहे,” असे आश्वासन देत त्यांनी विद्यार्थ्यांचा सरकारवरील दबाव वाढला पाहिजे यावर भर दिला.
“तुमच्याकडे पेपर फुटतात, आमच्याकडे मतं!”
विद्यार्थ्यांच्या उमेदीच्या काळाची होणारी नासाडी आणि शासकीय अनास्थेवर बोट ठेवताना राज ठाकरे म्हणाले, “तुमच्याकडे पेपर फुटतात, आमच्याकडे मतं फुटतात किंवा पळवली जातात. जसे तुमच्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे निघून जातात, तसेच आमचीही ५-५ वर्षे निघून जातात. सध्या देशात बेधुंदशाही सुरू असून एकाच बाजूने ‘मन की बात’ सुरू आहे, दुसऱ्या बाजूला जणू काही लोकांचे मनच नाही. अनेक तरुण कर्ज काढून, आई-वडिलांनी कष्टाने पाठवलेल्या पैशांवर पुण्यात शिकायला आले आहेत; मात्र त्यांना जटिल आणि नको त्या प्रश्नांमध्ये अडकवून ठेवले जात आहे.”
७० हजारांची मेगा भरती ही फसवणूक; सरकारवर थेट निशाणा
राज ठाकरे यांनी एमपीएससी परीक्षार्थींसमोर पुन्हा एकदा वास्तव मांडत सरकारवर सडकून टीका केली. “सरकार ७० हजारांच्या मेगा भरतीची घोषणा करत असले तरी मी सांगतो, ही भरती होणार नाही. कोणाचेही सरकार आले तरी ७० हजार पदे भरली जाणार नाहीत. कारण सर्वांना नोकऱ्या मिळाल्या तर तुम्ही आंदोलने कशी कराल?” असा सवाल त्यांनी केला. सध्या सर्व गोष्टींचे खासगीकरण सुरू असून विमानतळांपासून ते इतर सर्व महत्त्वाचे प्रकल्प अदानींसारख्या उद्योगपतींच्या घशात घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“राजकारण्यांमध्ये भीती निर्माण करा, तरच प्रश्न सुटतील”
चुकीच्या सरकारी धोरणांवर आणि मतदानाच्या पद्धतीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “निवडणुकीच्या वेळी पैसे फेकून, जेवणावळी आणि दारू देऊन मते घेतली जातात. त्यामुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा गैरसमज जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यामुळे तरुणांनी स्वतःचे राजकीय मोल ओळखून तुमचे म्हणणे ऐकण्यास भाग पाडणारी भीती राजकारण्यांमध्ये निर्माण केली पाहिजे.” आपण राजकारण करायला आलो नसून बोलतो ते कटू असते, पण तेच वास्तव असल्याचे सांगत त्यांनी लवकरात लवकर एमपीएससीचे प्रश्न मार्गी लागावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.














