रोहित पवारांच्या आंदोलनात कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचा घणाघात; ‘आपण आंदोलकांच्या रागात सामील’ असल्याचा राज ठाकरेंचा पाठिंबा
*पुणे:*
MPSC Protest Pune अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांचे पेपर फुटल्याच्या निषेधार्थ आणि आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी कोल्हापूरच्या विवेकानंद पाटील या आंदोलक विद्यार्थ्याने राज ठाकरेंच्या मंचावर केलेले भाषण चांगलेच गाजत असून त्याची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
*”आमदार, पक्ष फोडले तेव्हा वाटलं नाही, पण पेपर फुटला अन् आभाळ फाटलं!”*
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना विवेकानंद पाटील म्हणाला, “पेपर फोडून या लोकांनी मराठी तरुणांवर प्रचंड अन्याय केला आहे. अन्न व औषध प्रशासन असो, की ग्रुप बी आणि सी च्या परीक्षा असोत—गेल्या चार-पाच वर्षांत एमपीएससीचे सगळेच पेपर फुटले आहेत. राजकीय नेत्यांनी आमदार फोडले, खासदार फोडले, पक्ष फोडले, तेव्हा आम्हाला काही वाटलं नाही; पण एमपीएससीचा पेपर फुटला आणि आमचं आभाळच फाटलं.” मराठी मुलांचे भवितव्य अंधारात जात असताना नवनिर्माण कसे घडणार, असा सवाल उपस्थित करत त्याने राज ठाकरेंकडे न्यायासाठी साद घातली.

*”तुमच्याकडे पेपर फुटत आहेत, आमच्याकडे मतं!” – राज ठाकरे*
विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, ते फक्त आंदोलकांच्या रागात सामील होण्यासाठी येथे आले आहेत. ” सरकारी फसवणुकीमुळे तरुणांच्या आयुष्यातील उमेदीचा काळ निघून जात आहे. तुमच्याकडे पेपर फुटत आहेत, तर आमच्याकडे मतं फुटत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. देशात मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून लोकांना जाती-पाती आणि धर्माच्या राजकारणात अडकवले जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
*७० हजार पदभरतीची वस्तुस्थिती आणि मराठी तरुणांचा हक्क*
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगताना म्हटले की, “सरकार ७० हजार पदांच्या भरतीची घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात ती होणार नाही, हीच वस्तुस्थिती आहे.” मात्र, महाराष्ट्रातील ज्या काही नोकऱ्या शिल्लक आहेत, त्यावर पहिला हक्क मराठी मुलांचाच असायला हवा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. निवडणुकांच्या काळात मतदारांना भ्रष्ट करून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा गैरसमज जनता जोपर्यंत दूर करत नाही, तोपर्यंत सिस्टीममध्ये बदल होणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.













