पुढच्या दीड महिन्यात पेट्रोल १७० तर डिझेल १५० रुपये होणार; वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर : देशातील आर्थिक परिस्थिती, इंधन दरवाढ, आरक्षणाचा मुद्दा आणि धार्मिक तेढ यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी काळात देशात आर्थिक आणीबाणी आणि लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा भीतीदायक इशारा नागरिकांना दिला आहे.

आर्थिक आणीबाणीचे संकेत, देशात आर्थिक गुंतवणूक करताना सावधान! – वडेट्टीवारांचा इशारा

​देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “येत्या महिना-दीड महिन्यात डिझेल १५० रुपये तर पेट्रोल १७० रुपये प्रति लीटरवर पोहोचलेलं दिसेल. मध्यमवर्गीय माणसाला मारण्यासाठीच हे सरकार आलं आहे. देशात इंधन तुटवडा नाही असं सरकार सांगत असलं, तरी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी आरसी बुक दाखवून डिझेल दिलं जात आहे. हा तुटवडा नाही तर काय आहे? विमान सेवा रद्द होत आहेत.

​पुढे बोलताना त्यांनी जनतेला एक मोठा सल्ला दिला, “भविष्यात लॉकडाऊनसारखे दिवस येणार आहेत. तुमच्याकडे पैसे असतील तर ते सुरक्षित ठेवा, कुठेही मोठी गुंतवणूक करू नका; कारण ती परत मिळणार नाही. आरबीआय (RBI) रिकामी केली जात असून बँका पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे दलाल!

​सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर थेट बोलणे टाळत वडेट्टीवारांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोग हा भाजपचा दलाल आहे, हे आता लपून राहिलेले नाही. बंगाल, बिहारमध्ये जिथे भाजप जिंकू शकत नव्हती, तिथे विरोधकांची मते कमी करून निवडणुका जिंकल्या गेल्या. माझ्यावर काय कारवाई करायची ती त्यांनी करावी, पण मी हे बोलतच राहणार, असा थेट इशारा त्यांनी दिला.

जरांगे पाटील आंदोलन आणि मराठा-ओबीसी आरक्षण

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकारकडून केवळ आश्वासनांच्या ‘वाटण्याच्या अक्षता’ लावल्या जात आहेत. जीआर निघतात पण अंमलबजावणी होत नाही. जरांगे पाटील त्यांच्या विषयासाठी लढत आहेत, आम्ही ओबीसींसाठी लढू. पण सरकारने तिजोरी पूर्णपणे रिकामी केली असून आता कोणालाही देण्यासाठी काही शिल्लक राहिलेले नाही. ८५% लोकांना ५०% आरक्षण आणि १५% लोकांना ५०% आरक्षण अशी परिस्थिती सरकारने करून ठेवली आहे. त्यामुळे कोणाच्याच हातात काही पडणार नाही.

धार्मिक तेढ निर्माण करून महत्त्वाच्या प्रश्नांना बगल

​कल्याणमधील बकरी ईद दरम्यान झालेल्या तणावावर बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर ध्रुवीकरणाचा आरोप केला. “देशात दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा धंदा सुरू आहे. जनतेच्या भावना भडकवून राजकारण करायचे आणि लोकांना मारायचे, हाच यांचा अजेंडा आहे. मूळ आणि महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले जात आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

भाजपचे उमेदवार जाहीर होताच ‘पळवापळवी’ थांबेल!

​राजकीय पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी भाजपला टोला लगावला. “कोण कुठे गेले यावर उमेदवार फायनल होईपर्यंत मी बोलणार नाही. भाजपचे उमेदवार अजून निश्चित झालेले नाहीत, त्यांच्यात अंतर्गत वाद सुरू आहेत. एकदा का भाजपचे उमेदवार जाहीर झाले की गेलेले सगळे परत येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कर्नाटकातील नेतृत्वबदलाच्या चर्चेवर बोलताना, हाय कमांडचे यावर लक्ष असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असे स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 28-05-2026