एल-निनोचा प्रभाव अधिक तीव्र; जून आणि जुलै महिन्यात मान्सून कमजोर राहण्याची शक्यता
नागपूर:
विदर्भातील मान्सूनबाबत चिंताजनक संकेत हवामान विभागाकडून समोर येत असून, यंदाचा पावसाळा काहीसा आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एल-निनोच्या सक्रियतेसोबतच भारतीय महासागरीय द्वि-ध्रुवीता (Indian Ocean Dipole – IOD) ही पाऊस निर्माण करणारी अत्यंत महत्त्वाची प्रणाली सध्या निष्क्रिय असल्याने देशातील मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. यामुळे मध्य भारतासह संपूर्ण विदर्भात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरचे वैज्ञानिक आणि हवामान अंदाज अधिकारी डॉ. प्रवीण कुमार यांनी ‘लोकमत व्यासपीठ’ येथे सद्यस्थितीवर सविस्तर भाष्य केले.
केरळ ते कोकण मजल मारल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला
यंदा मान्सूनने केरळमध्ये वेळेत प्रवेश करून कोकणापर्यंत वेगाने मजल मारली होती, मात्र त्यानंतर त्याचा पुढचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला आहे. मान्सूनची पुढील प्रगती खोळंबल्याने हवामान तज्ज्ञांची काळजी वाढली असून यामागे ‘एल-निनो’चा प्रभाव हा मुख्य घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. प्रवीण कुमार यांच्या मते, एरवी एल-निनो सक्रिय असताना भारताला पूरक ठरून पावसाला चालना देणारी ‘आयओडी’ प्रणालीही यंदा निष्क्रिय अवस्थेत आहे. त्यामुळे मान्सूनला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आवश्यक असलेले बळ मिळू शकलेले नाही.
आयओडी फेज-१ मध्ये; सक्रिय होण्यास अजून दोन ते तीन आठवड्यांचा वेळ
आयओडी ही प्रामुख्याने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या तापमानातील फरकावर आधारित असणारी प्रणाली आहे. ही प्रणाली सकारात्मक अवस्थेत गेल्यास भारतात चांगला पाऊस पडण्यास मोठी मदत होते. मात्र, सध्या ही प्रणाली प्राथमिक अशा ‘फेज-१’ मध्ये अडकली आहे. तिला अधिक प्रभावी असणाऱ्या ‘फेज-४’ पर्यंत पोहोचण्यासाठी आणखी किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. परिणामी, जून महिना आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात मान्सूनचा जोर कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भात केवळ ९० ते ९२ टक्के पावसाचा अंदाज; शेती व पाणीटंचाईची चिंता
हवामान तज्ज्ञांच्या अधिकृत अंदाजानुसार, मध्य भारत आणि विदर्भात यंदा दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९० ते ९२ टक्के इतकाच पाऊस होण्याची शक्यता आहे. हा आकडा सरासरीपेक्षा कमी असल्याने खरीप हंगामातील पेरण्या उशिरा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे भविष्यात धरणे, तलाव आणि भूजल पातळीवर विपरीत परिणाम होऊन पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते. या पार्श्वभूमीवर डॉ. कुमार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील कोणत्याही अप्रमाणित हवामान अंदाजांवर विश्वास न ठेवता केवळ हवामान विभागाच्या अधिकृत माहितीच्या आधारेच पेरणीचे व शेतीचे निर्णय घ्यावेत.
‘प्रतिचक्रवात’मुळे पश्चिम विदर्भात यंदा उष्णतेचा कहर
यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाने हवामान बदलाचा (Climate Change) तीव्र फटका सहन केला आहे. नागपुरात सलग १२ दिवस उष्णतेची लाट होती, तर काही जिल्ह्यांमध्ये हा कालावधी तब्बल १९ दिवसांपर्यंत लांबला होता. विशेष म्हणजे, नेहमी जास्त तापणाऱ्या पूर्व विदर्भाऐवजी यंदा पश्चिम विदर्भातील वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसला. पश्चिम विदर्भाच्या वरच्या वातावरणात ‘प्रतिचक्रवात’ (Anti-cyclone) निर्माण झाल्यामुळे तेथे उष्ण हवा दीर्घकाळ अडकून राहिली आणि तापमानात मोठी वाढ झाली. वाढते शहरीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे आता केवळ काही किलोमीटरच्या परिघातच अचानक ढग येणे, वीज पडणे यांसारख्या स्थानिक हवामान बदलांचा अंदाज देणे अधिक आव्हानात्मक बनत चालले आहे.
अचूक अंदाजासाठी नागपुरात नवीन डॉप्लर रडार; ‘हर घर मौसम’ संकल्पना होणार साकार
हवामान अंदाज अधिक अचूक आणि स्थानिक पातळीवर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत नागपुरातील खापरी रोडवरील कापूस संशोधन केंद्र परिसरात अत्याधुनिक डॉप्लर हवामान रडार उभारण्यात येणार आहे. पुढील चार महिन्यांत हे रडार पूर्णपणे कार्यान्वित होईल. सध्याचे रडार २५० ते ५०० किलोमीटर क्षेत्राचे निरीक्षण करते, तर हे नवीन रडार स्थानिक पातळीवर १०० ते १५० किलोमीटर क्षेत्रातील पाऊस, वादळी वारे आणि तीव्र हवामान घटनांचे अधिक अचूक निरीक्षण करेल. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे गाव आणि पंचायत स्तरापर्यंत २ ते ६ किलोमीटरच्या परिघातील हवामान माहिती देणे शक्य होणार असून, प्रत्येक नागरिकापर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याचे ‘हर घर मौसम’ हे उद्दिष्ट हवामान विभाग यशस्वीपणे पूर्ण करणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 17-06-2026














