नियम मोडल्यास २५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद; एकल वापर प्लास्टिक पूर्णपणे बंद करून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन
रत्नागिरी:
Plastic Ban Ratnagiri मोहिमेला गती देण्यासाठी आणि शहरात एकल वापर प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे व्यापारी वर्गाची विशेष मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती. नगर परिषद सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत ‘एकल वापर प्लास्टिक बंदी’ आणि ‘घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६’ संदर्भात विस्तृत सादरीकरण करण्यात आले. माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ शिवराज जाधव यांनी या विषयावर उपस्थित व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रतिबंधित प्लास्टिकवर पूर्ण बंदी आणि नियमावली
महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक, विक्री आणि वितरण पूर्णपणे बंद करण्याबाबत व्यापाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. शहरातील बाजारपेठेतून सिंगल युज प्लास्टिक पूर्णपणे हटवून कापडी पिशव्यांसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिक व व्यापाऱ्यांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे, यावरही चर्चा झाली.
नियमांचे उल्लंघन केल्यास ५ हजारांपासून २५ हजारांपर्यंत दंड
बैठकीत वापरण्यास परवानगी असलेले प्लास्टिक आणि निर्बंध असलेले प्लास्टिक यातील फरक स्पष्ट करण्यात आला. तसेच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर नियमानुसार कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये पहिल्या उल्लंघनासाठी ५,००० रुपये, दुसऱ्या उल्लंघनासाठी १०,००० रुपये आणि तिसऱ्या उल्लंघनासाठी २५,००० रुपये दंडाची तरतूद असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून ‘प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ रत्नागिरी’ घडवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीस नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, आरोग्य सभापती राकेश नागवेकर, विविध समितींचे सभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपमुख्याधिकारी मयूर बेहेरे आदी प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 13-08-2026













