जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची पत्रकार परिषदेत माहिती; ‘अधिनिर्णय’ आणि ‘मिशन रॅपिड’ या नवीन digital उपक्रमांची घोषणा
रत्नागिरी:
Ratnagiri Police E Governance Award मिळवून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यभरात आपल्या उत्कृष्ट आणि पारदर्शक कामगिरीचा ठसा उमटवला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात रत्नागिरी पोलीस दल राज्यात आघाडीवर आहे. पोलीस दलाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित ‘ई-गव्हर्नन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सामाजिक उपक्रम आणि ‘रेड्स’ ॲपची उत्कृष्ट कामगिरी
पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले की, रत्नागिरी पोलीस दलातर्फे सध्या एकूण २९ सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. ‘मिशन रायझिंग फ्लॉवर’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे, तर ‘मिशन जीवन’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा मोठा डेटाबेस तयार करून त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात आल्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय पातळीवर चालवल्या जाणाऱ्या ‘रेड्स’ (REDS) ॲपच्या मदतीने बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेणे, अज्ञात मृतदेहांची ओळख पटवणे आणि बाहेरील घटकांतील खूनांच्या केसेसची उकल करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे खेडमधील एका खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा २० वर्षांनंतर शोध घेण्यात या ॲपची मोलाची मदत झाली आहे.
‘अधिनिर्णय’ आणि ‘मिशन रॅपिड’ या नव्या उपक्रमांची सुरुवात
तंत्रज्ञानाच्या वापरात आणखी एक पाऊल पुढे टाकत रत्नागिरी पोलिसांनी ‘अधिनिर्णय’ आणि ‘मिशन रॅपिड’ हे दोन नवीन उपक्रम सुरू केले आहेत. यात ‘अधिनिर्णय’ हे देशातील अशा प्रकारचे पहिलेच ॲप ठरले आहे. न्यायालयात सुटणाऱ्या केसेसमधील निकालांची सविस्तर माहिती, तपासात काय चुका झाल्या आणि आरोपी कसे सुटले, याचे विश्लेषण पोलिसांना एकाच फॉर्मॅटमध्ये मिळण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे, ज्यामुळे भविष्यातील तपासाची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
तंत्रज्ञान आणि एआय वापरामुळे तपासाला गती
रत्नागिरी पोलीस दल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात कुठेही मागे राहिलेले नाही. तंत्रज्ञानाच्या जोरावर गुन्हेगारीवर वचक बसवणे आणि सामाजिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे सहज शक्य झाले असून, याच ई-गव्हर्नन्स मॉडेलमुळे पोलीस दलाची मान उंचावली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:16 13-08-2026













