पानवल धरण : धरण भरूनही नागरिक पाण्यासाठी मुकणार? पालिकेच्या थकीत बिलामुळे प्रकल्प रखडला

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचा पुढील काळातील पाणीप्रश्न मिटवण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेच्या वतीने १६ कोटी रुपये खर्च करून पानवल धरणाची दुरुस्ती आणि गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आगामी पावसाळ्यात धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार असला, तरी तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे शहरवासीयांना या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणापासून ते नाचणे येथील मुख्य जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आवश्यक असणाऱ्या १ किलोमीटर अंतराच्या मुख्य पाईपलाईनचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे हा गंभीर पेच उभा राहिला आहे. ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी स्थिती सध्या रत्नागिरीकरांची झाली आहे.

१६ कोटींचा प्रकल्प; साठवण क्षमता वाढली, पण पाणी आणणार कसे?

रत्नागिरी पालिकेने मोठा निधी खर्च करून पानवल धरणाचे नूतनीकरण केले आहे. यामध्ये धरणाची गळती थांबवण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे, सांडव्याचे आधुनिकीकरण करणे आणि साचलेला हजारो टन गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. या यशस्वी कामामुळे धरणाची गळती पूर्णपणे थांबली असून पाणी साठवण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. नैसर्गिक उताराने शहराला पाणी पुरवणाऱ्या या धरणातून पावसाळ्यानंतर साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, धरणातील पाणी नाचणे येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी मुख्य वाहिनी टाकण्याचे कामच न झाल्याने धरणात साठणारे पाणी शहरापर्यंत पोहोचवणे सध्यातरी अशक्य दिसत आहे.

साडेचार कोटींचे बिल रखडल्याने ठेकेदाराकडून काम बंद

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत प्रशासकीय स्तरावरील आर्थिक नियोजनाचा अभाव उघड झाला आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सुमारे साडेचार कोटी रुपयांची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, पालिकेकडून या कामाचे थकीत बिल अद्याप मिळालेले नाही. पुढील कामासाठी लागणारे पाईप संबंधित ठेकेदाराने स्वतः १ कोटी रुपये खर्चून ठिकठिकाणी आणून ठेवले आहेत. परंतु, जुनी थकबाकी न मिळाल्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या ठेकेदाराने पुढील काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. परिणामी, पानवल ते नाचणेदरम्यानचे पाईपलाईनचे काम सध्या पूर्णपणे ठप्प आहे.

शीळ धरण आणि एमआयडीसी या पर्यायी स्रोतांवरच अवलंबित्व

साधारण ७६ हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी शहरात सुमारे ८ हजार नळजोडण्या आहेत. पावसाळा अगदी तोंडावर आलेला असताना हे पाईपलाईनचे काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर १६ कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ कागदावरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. धरण तुडुंब भरूनही केवळ पाईपलाईनअभावी नागरिकांना पाणी मिळणार नाही. अशा स्थितीत शहराला पाणीपुरवठ्यासाठी केवळ शीळ धरण आणि एमआयडीसी या पर्यायी व्यवस्थांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने हस्तक्षेप करून ठेकेदाराची थकबाकी द्यावी आणि हे काम पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.

प्रशासकीय भूमिका: लवकरच काम सुरू होणार

या रखडलेल्या कामाबाबत रत्नागिरी पालिकेचे पाणी सभापती निमेश नायर यांनी प्रशासनाची बाजू मांडली आहे. नायर यांनी सांगितले की, “पानवल ते नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचे पाईप टाकण्याचे काम काही कारणास्तव रखडले होते. याबाबत आम्ही ठेकेदाराशी सकारात्मक चर्चा केली असून हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कामासाठी लागणारे पाईप संबंधित ठिकाणी आधीच येऊन पडले आहेत, त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला गती दिली जाईल.”