खेड (लोटे): Gharda Chemical Gas Leak म्हणजेच खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील नामांकित घरडा केमिकल कंपनीत एका प्लांटमध्ये काम करत असताना वायू गळतीची बाधा होऊन एका स्थानिक ज्येष्ठ कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे आवाशी गाव आणि संपूर्ण पंचक्रोशीत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या रुग्णालयात वेळेवर वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचारास विलंब झाला आणि त्यातच या कामगाराचा मृत्यू ओढवल्याचा प्राथमिक आरोप समोर येत आहे.
रविवारी दुपारच्या पाळीत झाली होती वायूची बाधा
प्राप्त माहितीनुसार, आवाशी ताम्हणवाडी येथील मूळ रहिवासी असलेले सुधीर बाळकृष्ण आंब्रे (वय ५७ वर्षे, सध्या रा. आवाशी गणेशनगर) हे रविवारी (१४ जून) दुपारच्या पाळीत घरडा केमिकल कंपनीत कर्तव्यावर होते. रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास ते ज्या प्लांटमध्ये काम करत होते, तिथे अचानक झालेल्या वायू गळतीमुळे त्यांना शारीरिक त्रास सुरू झाला. वायूची बाधा झाल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने कंपनीच्या अंतर्गत प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर रात्री अकरानंतर ते घरी परतले, मात्र रात्रभर त्यांना खोकल्याचा तीव्र त्रास सहन करावा लागला.
त्रास होत असतानाही सोमवारी हजर झाले कामावर
रात्रभर खोकल्याचा त्रास होत असतानाही सुधीर आंब्रे हे सोमवार (१५ जून) रोजी सकाळी पहिल्या पाळीत पुन्हा कंपनीत कामावर रुजू झाले. मात्र, प्लांटमध्ये काम करताना त्यांना पुन्हा एकदा वायू गळतीचा जुना त्रास तीव्रतेने जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी तात्काळ कंपनीच्या वैद्यकीय कार्यालयात जाऊन उपचार घेतले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत चालली असून त्रास कमी होत नसल्याचे तेथील डॉक्टरांच्या निदर्शनास आले.
डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे उपचारास विलंब; सायंकाळी मृत्यू
कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून त्यांना पुढील उपचारांसाठी कंपनीच्या ‘घरडा रुग्णालयात’ पाठविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकारी वेळेत हजर नसल्याने आंब्रे यांना पुढील तातडीचे उपचार मिळण्यास मोठा विलंब झाला. याच विलंबादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि सोमवार १५ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू ओढवला.
३५ वर्षांची सेवा; ८ महिन्यांत होणार होते सेवानिवृत्त
मृत सुधीर आंब्रे हे घरडा केमिकल कंपनीत गेल्या जवळपास ३५ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देत होते. कंपनीतील कामगार युनियनचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी सक्रिय आणि महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अवघ्या आठ महिन्यांनंतर ते आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यापूर्वीच हा काळाचा घाला आला.
सामाजिक कार्यात सहभाग आणि मोठा परिवार
सुधीर आंब्रे हे केवळ कंपनीतच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही आदराचे स्थान ठेवून होते. ते श्री समर्थ बैठकीच्या धर्माधिकारी संप्रदायाचे निरुपणकार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या खेळकर आणि मनमिळाऊ स्वभावामुळे संपूर्ण खेड आणि लोटे पंचक्रोशीत त्यांचे मोठे मित्रमंडळ होते. त्यांच्या या अचानक जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातू, तीन भाऊ आणि बहिणी असा मोठा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 18-06-2026














